सकाळी ११ नंतरही फेरीवाले रस्त्यावर, विनाकारण फिरणाऱ्यांचीही गर्दी वाढली

ठाणे/बदलापूर : राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनावश्यक वस्तू विक्री करण्यास मुभा दिली आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश आहे. मात्र त्यानंतरही ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील अंतर्गत भागांमध्ये ठिकठिकाणी फेरीवाले तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या गस्तीच्या ठिकाणी केवळ मूठभर पोलीस असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आदेश कागदावरच असल्याचे चित्र शहरातील बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रुग्णसंख्येने कळस गाठला आहे. त्यामुळे दररोज जिल्ह्यात अडीच ते तीन हजार रुग्ण आढळून येत आहे. करोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पोलीस तसेच महापालिका प्रशासनाला विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानेही केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र पोलीस आणि पालिका प्रशासन संथ कारभारामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिक तसेच फेरीवाले पुन्हा एकदा रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता वागळे इस्टेट, ढोकाळी, मनोरमानगर, यशोधननगर, वर्तकनगर यांसारख्या ठिकाणी रस्त्याकडेला फेरीवाल्यांच्या फळे आणि भाजीच्या हातगाड्या सकाळी ११ नंतरही उभ्या असतात. त्यामुळे नागरिकही या हातगाड्यांवर खरेदी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच शहरातील रस्त्यांवरही अशीच परिस्थिती आहे. शहरातील माजिवडा, कापूरबावडी, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन या ठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारले आहेत. मात्र ते नावापुरतेच असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचारी केवळ बसून असतात. कोणत्याही प्रकारची अडवणूक केली जात नसल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्येही अशीच परिस्थिती आहे. बदलापूर शहरात सकाळी ११ नंतरही अनेक फेरीवाले फिरत असतात. तर अंबरनाथमध्ये सकाळी जीवनावश्यक वगळता इतर दुकानांची दारे अर्धवट उघडी ठेवून वस्तूंची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. तर रस्त्यावर पोलिसांकडून नागरिकांची चौकशी सुरू नसल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दीही वाढली आहे. उल्हासनगरमध्ये कपड्यांच्या दुकानांबाहेर विक्रेते उभे असतात. गिऱ्हाईक आल्यावर त्यांना दुकानाचे दार उघडून आत सोडण्यात येत असल्याचे दिसत आहे. बदलापूर येथील स्थानकाबाहेर सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीविक्रेते पदपथ अडवून बसू लागले आहेत. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जर नियमभंग होत असतील तर, संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात येतील. – डॉ. सुरेश मेकला, सहआयुक्त, ठाणे शहर पोलीस.