जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चीन आणि युरोपला आतापर्यंत करोनाचा मोठा फटका बसला आहे. भारतामध्येही करोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने वेगाने पावलं उचलत सर्व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केल्या आहेत. देशात करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये याकरता, १५ एप्रिलपर्यंत बाहेरील देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचे नियम कडक करण्यात आलेले आहेत. मात्र याच कठोर नियमांचा फटका आता भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे.

फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी मनिला येथून कॉलालाम्पूरमार्गे मुंबईत येण्याचा मार्ग स्विकारला. मंगळवारी संध्याकाळी मलेशियात पोहचलेल्या या विद्यार्थ्यांना मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाने बुधवारी सकाळी सिंगापूर येथे आणण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं तिकीटही देण्यात आलं. बुधवारी दुपारी मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे बोर्डिंग पास घेण्यावेळी या विद्यार्थ्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत.

मलेशियातून येणाऱ्या लोकांना भारतात येण्यासाठी निर्बंध असल्याचं सांगत, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना भारतात नेण्यास नकार दर्शवला. परिणामी सध्याच्या घडीला सर्व विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर कोणत्याही मदतीशिवाय अकडून बसले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आलेलं नाही.

कोणत्याही मदतीशिवाय हे विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले असल्यामुळे भारतात त्यांचे नातेवाईक चिंतेत अडकले आहेत. यामध्ये डोंबिवलीत राहणाऱ्या हिमांशू जोशी यांचा भाऊही या विद्यार्थ्यांमध्ये अडकला आहे. भारत सरकारने या विद्यार्थ्यांना तात्काळ देशात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नातेवाई करत आहेत.