05 April 2020

News Flash

Coronavirus : वसईत ११ अलगीकरण कक्ष

परदेश प्रवास करून आलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांची संख्या २६३वर पोचली आहे.

वसईतील उद्योजकांनी शुक्रवारी दुपारपासून औद्योगिक वसाहती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पालिका क्षेत्रातील रिसॉर्टमध्ये यंत्रणा; जिल्ह्य़ात सतर्कतेत वाढ

पालघर : परदेश प्रवास केलेल्या भारतीयांचे रिसॉर्टमध्ये अलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे.  पालघर जिल्ह्यातील वसई- विरार पालिका क्षेत्रातील ११रिसॉर्ट निवडण्यात आली आहेत. याठिकाणी ४८८ नागरिकांची अलगीकरण करण्याची सुविधा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली.

आणीबाणीची परिस्थिती असल्याने नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. आम्ही यापूर्वीच धार्मिक नेत्यांच्या बैठका घेऊन उत्सव आणि कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी तेथे उपस्थिती दर्शविली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वसईचे अतिरीक्त पोलीस आयुक्त विजयकांत सागर यांनी दिली.

दरम्यान, पालघरचे जिल्हाधिकारी तसेच मुंबई सरधर्मप्रांताचे आर्चबिशप यांच्याशी चर्चा करून मिस्साविधी १५ दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मगुरू भाविकांच्या हेतूसाठी खासगीत मिस्सा करू शकतील,  वसई धर्मप्रांतचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी सांगितले. मिरा भाईंदर शहरात खबरदारीची पावले म्हणून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ ते सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत अत्यावश्यक बाबींशिवाय  सर्व गोष्टीवर बंदी चा निर्णय घेण्यात आला.

कॉल सेंटरवर नजर

शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सर्व  कर्मचाऱ्यांना मिरा-भाईंदर शहरातील  कॉल सेंटर कार्यालयात बोलावल्याचे उघडकीस आल्याने  कार्यालयाची पालिका आयुक्तांनी  पाहणी केली.      कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेनुसार  अधिकाधिक काम करण्याचे आव्हान केले. शहरात मोठय़ा प्रमाणात कॉल सेंटर आहेत. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही कार्यालयात मोठय़ा संख्येने जमा होऊन  काम न करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे कॉल सेंटरमधील काम हे  महत्त्वाचे असल्याने त्यावरील पूर्णत: बंदीचा निर्णय पालिकेकडून मागे घेण्यात आला होता.

भाईंदर पूर्व परिसरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससमोरील ‘एमएमआरडीए’च्या इमारतीत सुरू केलेल्या अलगीकरण कक्षाला विरोध करणाऱ्या नागरिकांविरोधात  पालिकेकडून नवघर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १२ स्थानिक नागरिकांविरोधात प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती. परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांसाठी गोल्डन नेस्ट परिसरातील  एमएमआरडीए  इमारतीत पालिकेकडून अलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. ६०० खोल्यांची सोय करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिका  तैनात करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांकरिता टीव्ही,  वायफाय,  आणि वर्तमान पत्राची सोय करण्यात आली आहे.

उपाययोजना अशा..

’ परदेश प्रवास करून आलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांची संख्या २६३वर पोचली आहे. त्यापैकी ५० नागरिकांचा १४ दिवसातील देशातील वास्तव्य काळ संपला आहे. उर्वरित प्रवाशांपैकी  १४ नागरिकांना करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्याने या सर्वाच्या चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी या सर्व चाचण्या नकारात्मक (निगेटिव्ह) आल्या आहेत.

’ रेल्वे स्थानक, बस स्थानकांत दर दोन ते तीन तासांनी स्वच्छता करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली आहे. एस.टी कर्मचारी तसेच रेल्वे आणि एसटी मधील सफाई कर्मचाऱ्यांनी दैनंदिन तपासणी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात केली जाणार आहे.

’ पाणीपुरवठा, स्वच्छता विषयक सेवा, बँकिंग सेवा, दूरध्वनी व संचार सेवा, रेल्वे वाहतूक सेवा, अन्न, भाजीपाला व किराणामाल सेवा, दवाखाना, वैद्य्कीय केंद्र, औषधालय,वीज, पेट्रोलियम ऑईल, एनर्जी, प्रसारमाध्यम, बंदर व आवश्यक सेवेसाठी दिल्या आयटी सेवा सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

’ करोना प्रतिबंधात्मक असल्याचे सांगून बनावट कापड आवरणे आणि जंतुनाशकांची  विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

चर्च १५ दिवस बंद

वसईतील चर्चने शुक्रवारी मध्यरात्रीपासून ४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत मिस्साविधीही स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता चर्चमध्ये मिस्साही होणार नाहीत. वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी समाजमाध्यमातून अधिकृत घोषणा केली.

५२ दुकानदार, ३ डॉक्टरांवर गुन्हे

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वसई  पोलिसांनी कारवाई केली. यात ५२ दुकांनावर, ३ डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले. याशिवाय मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रार्थनास्थळी आलेल्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 2:31 am

Web Title: coronavirus 11 isolation wards in the vasai
Next Stories
1 Coronavirus : कडकडीत बंद!
2 महापालिकेत कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती
3 उल्हासनगरमधून धक्कादायक बातमी… १५०० भक्त उपस्थित असलेल्या सत्संगात होती करोनाग्रस्त महिला
Just Now!
X