आजवर केवळ २१० कोटी रुपयांची तिजोरीत भर

वसई : मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडे अखेरचे काही दिवस बाकी असताना कर संकलन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते, मात्र सध्या देशात व राज्यात करोना वायरसचे सावट असल्याने त्याचा विपरीत परिणाम हा मालमत्ता कर वसुलीवरही झाला असून आजवर केवळ २१० कोटींची वसुली होऊ  शकली आहे.

वसई-विरार महापालिकेने सन २०१९-२० या चालू आर्थिक वर्षांत ३०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेने धोरण ठरवून कर्मचारी व पालिकेचे प्रभागीय साहाय्यक आयुक्त व मालमत्ता कर संकलन विभागाचे अधिकारी यासाठी कामाला लागले होते.

परंतु करोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे याआधी पालिकेच्या करवसुलीच्या कामात गुंतलेले कर्मचारी यांनीही या करोनाविषयीच्या जनजागृती करण्यावर भर दिला आहे, तर पालिकेतही गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी करभरणा हा ऑनलाइन स्वरूपात करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच याआधी पालिकेचे कर्मचारी मालमत्ता करधारकांनी कर भरावा ध्वनिवर्धकाच्या साहाय्याने सांगण्यात येत होते. आता मात्र करोना सावध राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्या अशा घोषणा केल्या जात असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठीची मोहीम हाती घेतल्यानंतर वर्षांगणिक चांगल्या प्रकारची मालमत्ता कर वसुली होऊ  लागली आहे. मागील वर्षी पालिकेने २२३ कोटींची वसुली केली होती, मात्र यंदाच्या वर्षी करोनाने घातलेल्या थैमानामुळे मालमत्ता कर संकलन थंडावले असून आताच्या चालू वर्षांत २१० कोटी रुपये इतकी वसुली झाली  आहे.

करोनामुळे मालमत्ता कर संकलन करण्यावर याचा परिणाम झाला आहे. करोनाचे मोठे संकट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पालिकेत येण्यास बंदी केली आहे. करोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा सुरळीतरीत्या कर संकलन केले जाईल.

– विश्वनाथ तळेकर, मालमत्ता कर संकलन अधिकारी