राज्यात अद्यापही करोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेले नसून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्यांसोबत अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. भिवंडी लोकसभेचे भाजपा खासदार कपिल पाटील यांनाही करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कपिल पाटील यांच्यासहित त्यांच्या कुटुंबातील एकूण सात जणांना करोनाची लागण झाली आहे.

खासदार कपिल पाटील हे हायवे दिवे येथील निवासस्थानी एकत्र कुटुंबात आपला मुलगा व तीन पुतणे यांच्यासह वास्तव्यास आहेत. कपिल पाटील यांच्या पत्नी यांना कुटुंबात सर्वप्रथम करोनाचा संसर्ग झाला. घरातील इतर व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्याने चाचणी केली असता त्यामध्ये खासदार कपिल पाटील, मुलगा, मुलगी, पुतण्या व दोन सूना असे एकूण आठ जण करोनाबाधित आढळून आले. या सर्वांवर उपचार सुरू असून खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने ते सध्या होम क्वारंटाइन झाले आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची प्रकृर्ती ठीक असून काळजीचे कारण नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. यावेळी कपिल पाटील यांनी सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानले आहेत .