वसई ग्रामीणमध्ये रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला

वसई : वसईच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागात करोना रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला असून दिवसागणिक सरासरी १० ते १२ करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

वसईच्या ग्रामीण भागात २१ एप्रिल रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या भागातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला केवळ तीन ते चार अशा स्वरूपातच रुग्ण आढळून येत होते.

विशेष करून ग्रामीण भागातील अर्नाळा, कळंब, चंद्रपाडा, रानगाव यासह इतर ठिकाणच्या भागांत वाढत जाणारा करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी मोहीम, त्याचसोबतच सामान्य नमुना तपासणी व अँटिजेन चाचण्या करण्यावर भर  देण्यात आला आहे. दिवसाला साधारणपणे  ७० ते ८० अशा स्वरूपात अँटिजेन चाचण्या केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेले संशयित रुग्ण व करोनाबाधित रुग्ण यांचा शोध घेण्यास चांगलीच मदत होऊ लागली आहे.

ऑगस्ट महिन्यात जवळपास २५२ करोनाचे रुग्ण आढळून आले होते; परंतु सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच मागील चौदा दिवसांतच २४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. करोनाच्या चाचण्यात वाढ झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

सध्या स्थितीत वसईत एकूण १ हजार ५३ करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ८३४ रुग्ण करोनामुक्त झाले असून ३६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर अद्यापही १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दीड हजारांहून अधिक शीघ्र प्रतिजन चाचण्या

वसईत शहरी भागाप्रमाणे वसईच्या ग्रामीण भागातही करोना संसर्गाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. याला रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभागाच्या विविध केंद्रांतून शीघ्र प्रतिजन (अँटिजेन टेस्ट) चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत वसईच्या ग्रामीण भागात १ हजार ५५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३१६ रुग्ण हे करोना सकारात्मक असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

ग्रामीण रुग्णांची आकडेवारी

महिना          रुग्णसंख्या      मृत्यू

एप्रिल                  ०२                   १

मे                        ३३                   २

जून                 १७२                     ६

जुलै                 ३५४                     १

ऑगस्ट           २५२                  २४

सप्टेंबर           २४०                   २

(१४ सप्टेंबपर्यंत)

एकूण              १०५३              ३६