उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड टक्का; रुग्ण दुपटीचा कालवधी ४२८ दिवसांवर

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याची बाब समोर आली आहे. शहरात आतापर्यंत ९६.२१ टक्के रुग्ण बरे झाले असून शहरात केवळ १.५३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच शहरातील रुग्ण दुपटीचा कालावधी ४२८ दिवसांवर आला आहे. करोना रुग्ण संख्येत घट होत असल्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून ही दिलासादायक बाब आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत शहरात ५४ हजार ४५० करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५२ हजार ३८८ (९६.२१ टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. तर १ हजार २३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्य:स्थितीत ८२९ रुग्णांवर उपचार सुरू असून त्याचे प्रमाण १.५३ टक्के इतके आहे. परदेशात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविली जात असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच ब्रिटनमध्ये  करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर महापालिका यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. शहरात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी प्रशासनाने चाचण्यांची संख्या अद्याप कमी केलेली नाही. शहरात दररोज साडेपाच हजार चाचण्या केल्या जात असून त्यात सरासरी शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत शहरात ७ लाख ९३ हजार ७९५ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६.८६ इतके आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. तसेच आठवडय़ाचा रुग्णवाढीचा वेग ०.१९ टक्के इतका आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ४२८ दिवसांवर आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णालयात ५४ टक्के आसीयूच्या खाटा तर ७१ टक्के व्हेंटिलेटरच्या खाटा रिकाम्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्या

काही दिवसांपासून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि रुग्ण संख्या कमी झाल्यानंतरही चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. यामुळेच शहरात करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महिनानिहाय करोना रुग्णांची संख्या

महिना      एकूण          दररोजचे

               करोना            सरासरी

                रुग्ण             रुग्ण

एप्रिल           २९८           १०

मे                  २७२२          ८८

जून               ५७४०          १९१

जुलै             १०,९२४        ३५२

ऑगस्ट          ६२१३          २००

सप्टेंबर          १०,८६२        ३६२

ऑक्टोबर       ९८९५          ३१९

नोव्हेंबर           ४६५१          १५५

डिसेंबर            १८७६          १०८