ज्येष्ठ डॉक्टरांचे घरबसल्या मार्गदर्शन, उपचार; करोनामुक्त झालेल्या अनेकांचा प्रतिसाद

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : करोना आजारातून बरे झाल्यानंतरही इतर त्रास जाणवत असलेल्या रुग्णांनी आता कौटुंबिक डॉक्टरकडे ऑनलाइन मार्गदर्शन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. काही डॉक्टर ६० वर्षांपुढील असल्याने त्यांना करोना साथीमुळे दवाखान्यात येणे जोखमीचे असल्याने ते घरबसल्या रुग्णांना ऑनलाइनद्वारे मार्गदर्शन आणि उपचार करीत आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरातील अनेक डॉक्टर या उपचार पद्धतीला प्राधान्य देत असून करोना आजारातून बरे झालेले रुग्ण या ऑनलाइन उपचार पद्धतीला चांगला प्रतिसाद देत आहेत, असे शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी सांगितले.

करोनातून बरे झालेले आणि शरीरप्रकृती नाजूक असलेल्या काही रुग्णांना आता दोन ते तीन महिन्यांनंतर पुन्हा अशक्तपणा, दम लागणे, भूक न लागणे, सांधेदुखी, झोप न लागणे असा त्रास जाणवत आहे. या रुग्णांना फुप्फुसाचा फायब्रोसिस हा आजार होऊ शकतो. अशा आजारांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करणे आवश्यक असते, असे खासगी डॉक्टरांनी सांगितले. उपचार करणारे बहुतांशी डॉक्टर ५० वर्षांच्या पुढील आहेत. काही जणांना गेल्या आठ महिन्यांच्या काळात करोनाची लागण झाली असून ते आता त्यातून बरे झाले आहेत. त्यांनाही आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक असते. दवाखाना सुरू केला तर तिथे विविध प्रकारचे रुग्ण येतात. यामधून करोना संसर्गाची भीती असते. हे टाळण्यासाठी तसेच रुग्णांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांनी आता ऑनलाइन मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपचारासाठी काही डॉक्टरांनी पॅकेज पद्धत ठरवली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयाने अशा प्रकारची उपचार पद्धती करोना रुग्णांसाठी सुरू केली आहे. करोनातून बरे झालेले काही रुग्ण हे वृद्ध आहेत. काहींना आधीपासूनच दमा, श्वसनाचा त्रास आहे. त्यांना आता करोनातून बरे झाल्यानंतरही दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे प्रकार होऊ शकतात. अशा रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार, सल्ल्याची गरज असते. काही घरांमध्ये वृद्ध जोडपी आहेत. त्यांना कोणाची मदत घेतल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. अशा रुग्णांना घरात बसून दिवसा, रात्री डॉक्टरांशी बोलता यावे यासाठी ही ऑनलाइन पद्धत खूप सोयीची आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. अशा रुग्णांना व्यायाम, योगा, चालणे, आहाराच्या पद्धतीबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येते.

करोना आजारातून बरे झालेले अनेक रुग्ण त्यांच्या दुखण्याच्या तक्रारी सांगतात. असेही रुग्ण अलीकडे रुग्णालयात वाढू लागले आहेत. अशा रुग्णांनापण तात्काळ उपचार मिळाले पाहिजेत. या विचारातून आपल्या रुग्णालयात करोनोत्तर रुग्णांसाठी विशेष तपासणी कक्ष उघडला आहे. डॉक्टरांचे एक स्वतंत्र पथक त्यांच्या दुखण्याचा विचार करून त्यांच्यावर उपचार करते.
– डॉ. मिलिंद शिरोडकर, एम्स रुग्णालय

करोनाच्या साथीनंतर केंद्र शासनाने खासगी डॉक्टरांना ऑनलाइन उपचार पद्धतीस परवानगी दिली आहे. दवाखान्यातील गर्दी टाळण्यासाठी, तिथे येणाऱ्या करोना रुग्णामुळे इतर रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी बहुतांशी खासगी डॉक्टरांनी ऑनलाइन उपचार पद्धतीला प्राधान्य दिले. करोनातून बरे झालेले आणि इतर आजाराचे रुग्ण या सुविधांचा लाभ घेत आहेत.
– डॉ. गिरीश जयवंत