लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : सोमवारपासून इयत्ता नऊ ते १२ वीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांनी करोना चाचणी करणे आवश्यक असल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने शिक्षकांच्या सोयीसाठी चार ठिकाणी करोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. या चाचणी केंद्रावर शिक्षकांची मोफत चाचणी करण्यात येणार आहे.

शासन आदेशाप्रमाणे ही चाचणी केंद्र प्रशासनाने सुरू केली आहेत. दरम्यान,  शहाड येथील साईनिर्वाण केंद्रात गुरुवारी सकाळी नऊ वाजता काही शिक्षिका गेल्या होत्या. त्यांना तिथे कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे ही केंद्रे फक्त कागदोपत्री प्रशासनाने सुरू केलीत का, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या चाचणी केंद्रावर टिटवाळा, कल्याण, डोंबिवली परिसरातून शिक्षक येणार आहेत. त्यामुळे चाचणी केंद्रे सकाळी नऊ वाजता सुरू व्हायला हवीत, अशी शिक्षकांची मागणी आहे.

चाचणी केंद्रांमधील ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांनी करोना चाचणी करून घेतल्या नाहीत. एखाद्या बाधित शिक्षकामुळे विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न शिक्षकांकडून केले जात आहेत. सकाळी नऊ वाजता चाचणी केंद्र सुरू करण्यात येतील, असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी जाहीर केले आहे.

दोनच दिवसापूर्वी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व पालिकांना पत्र पाठवून शिक्षकांसाठी मोफत करोना चाचणी केंद्र सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. विद्या निकेतन शाळेचे चालक विवेक पंडित यांनी शिक्षकांना मध्यवर्ती ठिकाणी पडेल अशा शाळा, केंद्रांमध्ये ही चाचणी केंद्र विभागवार सुरू करण्याची मागणी गेल्या आठवडय़ात प्रधान सचिव कृष्णा, पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यांची मागणी प्रशासनाने मान्य केली आहे.

चाचणी केंद्रे कुठे?

  • बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण : सकाळी आठ ते संध्याकाळी सहा.
  • वसंत व्हॅली करोना सेंटर, खडकपाडा : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.
  • साई निर्वाणा रेन्टल हाऊस, शहाड : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.
  • शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.
  • विद्या निकेतन शाळा, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.