अगरवाल अलगीकरण केंद्राला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : वसई-विरार शहरात वेगाने होत असलेल्या करोना संसर्गावर चिंता व्यक्त केली जात असतानाच महापालिकेला करोनाची चाचणी घेण्यासाठी अनुमती मिळाल्यामुळे काहीसे समाधान व्यक्त केले जात आहे. पालिकेच्या अगरवाल अलगीकरण केंद्रात करोना चाचणी घेण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईत होणारी चाचणी आता वसईतच होणार आहे.

वसईत करोना चाचण्या व्हाव्यात यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय मानव अधिकार आयोगाकडे वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी धाव घेतली होती. वसईची लोकसंख्या २५ लाखांच्या पलीकडे असून दररोज सरासरी ३०० रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न होत आहे. करोना चाचणी घेण्याची व्यवस्था नसल्यामुळे वसईत केवळ नमुने घेऊन ते चाचणीसाठी मुंबईला पाठवले जातात. यामध्ये वेळेचा मोठा अपव्यय होतो. चाचणीचे अहवाल वेळेवर येत नसल्यामुळे रुग्णावर उपचार सुरू करण्यातही विलंब होतो, ही बाब भट यांनी मानवाधिकार आयोगाच्या निदर्शनास आणली होती.

प्रा. मिश्रा यांचा अहवाल

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नागपूर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. मीना मिश्रा यांनी पालिकेच्या वसईतील अगरवाल अलगीकरण केंद्राची पाहणी करून तिथली सुविधा, अद्ययावत साधनसामग्री तथा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग इत्यादींचा आढावा घेऊन त्यानुसार अहवाल दिला होता.

चरण भट यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

शहरात सरकारी करोना चाचणी प्रयोगशाळा हवी, अशा मागणीचे पत्र चरण भट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठवले होते. आरोग्यमंत्र्यांनी २५ एप्रिल रोजी याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले होते. २८ एप्रिल रोजी मुख्य सचिवांनी वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले होते. आयुक्तांनी संबंधित विभागाकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पत्र पाठवल्याचे चरण भट यांना ५ मे रोजी कळवले होते. मात्र याप्रकरणी विलंब होत असल्याचे पाहून भट यांनी पुन्हा एकदा मानवाधिकार आयोगाकडे धाव घेऊन विषय तडीस नेला.

अगरवाल अलगीकरण केंद्रात करोना चाचणीकरिता परवानगी मिळाली आहे. बुधवारपासून या केंद्रात चाचण्यांना सुरुवात झाली आहे.

– गंगाथरन डी. , आयुक्त, वसई-विरार महापालिका