कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांचा इशारा

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तरीही अनेक रहिवासी मुखपट्टी न घालता रस्त्यावर फिरत असून बाजारांमध्ये अंतरसोवळ्याच्या नियमांचाही फज्जा उडू लागला आहे. ही बेशिस्त कायम राहिली. करोनाचे रुग्ण आहे त्या प्रमाणात वाढू लागले तर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पुन्हा शासन आदेशाप्रमाणे कठोर निर्णय लागू केले जातील, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

गेल्या २५ दिवसांच्या काळात महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या ५० ते ६० वरून थेट २५० पर्यंत पोहचली आहे. करोना रुग्ण वाढ होऊ लागल्याने सावध झालेल्या प्रशासनाने मागील वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुखपट्टी न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. घरोघरी साथ आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करणे, रेल्वे स्थानक, आगाराच्या प्रवेशद्वारांवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिजन चाचण्या करणे, प्रतिबंधित क्षेत्र तसेच इमारतीमधील रहिवाशांनी करोना संसर्गाचे नियम पाळावेत यासाठी पथके तयार करणे यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विवाह समारंभात फक्त ५० जणांना परवानगी असताना अनेक आयोजक, मंगल कार्यालय चालक विवाहस्थळी ५० चे गट तयार करून मंगल कार्यालयात गर्दी जमवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीच्या वेळी गर्दी जमा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या गर्दीतून करोना विषाणूचा फैलाव होत असतो. या गर्दीत सहभागी झालेले अनेक नागरिक मुखपट्टी घालत नाहीत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडाला मुखपट्टी नसते. काही भागांत चोरून लपून भाजीबाजार भरविले जातात. तेथे गर्दी जमविली जाते. हे सगळे नियमबाह्य़ प्रकार वेळीच थांबविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पण या प्रकाराला बाह्य़ शक्ती हातभार लावत असतील तर करोना प्रतिबंधासाठी कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा आयुक्त सूर्यवंशी यांनी दिला आहे.