लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण आणि अर्धनागरी भागातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी आणि स्थानिक क्रिकेटपटूंसाठी चांगल्या आर्थिक कमाईचे साधन बनलेल्या टेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धाही करोनामुळे कचाटय़ात सापडल्या आहेत. लाखो रुपयांचे राजकीय प्रायोजकत्व, खेळाडूंवर लागणाऱ्या हजारोंच्या बोली, भव्य आयोजन असा थाट असलेल्या या स्पर्धाना यंदा करोना महासाथीच्या धास्तीने प्रायोजकच मिळेनासे झाले आहेत. करोनाविषयक र्निबधांमुळे पोलिसांची परवानगी मिळवण्यातही अडथळे येत असल्याने जवळपास ४० टक्के स्पर्धा यंदा रद्द करण्यातआल्या आहेत.

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ात दिवाळीच्या नंतर टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते. गेल्या काही वर्षांपासून आयपीएलच्या धर्तीवर हे सामने भरविण्याचा पायंडा पडला आहे. त्यात संघ, संघमालक यांच्या खेळाडूंसाठी बोली लागतात. चांगल्या खेळाडूंना पालघरपासून रायगडपर्यंत विविध  स्पर्धामध्ये सहभागी होण्याची आणि त्यातून बक्कळ अर्थार्जन करण्याची संधी मिळते. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई पट्टय़ांतील ग्रामीण भागांसह पालघरमधील

वसई, विरार, वाडा आणि रायगडमधील पनवेल, उरण, तळोजा या परिसरांत अशा स्पर्धा भव्य स्वरूपात भरवण्यात येतात. यंदा मात्र त्यावर करोनाचे मळभ आहेत.  करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत यंदा अनेक ठिकाणी पोलिसांकडून स्पर्धाच्या आयोजनासाठी परवानगी नाकारण्यात येत आहे, तर करोनाचा फटका अनेक व्यवसायांना बसल्यामुळे आयोजकांना स्पर्धेसाठी प्रयोजक मिळवण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा या तीन जिल्ह्य़ांमधील ४० टक्के स्पर्धा रद्द झाल्या असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. मैदानामध्ये नियमांचे काटेकोर पालन मैदानामध्ये स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वाना अंतराच्या  नियमांचे पालन करणे आणि मुखपट्टीचा वापर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. तसेच मैदानात खेळताना टीम मीटिंग घेण्यासही परवानगी नाकारण्यात येत आहे. यासह सर्व खेळाडूंच्या शरीराच्या तापमानाची तपासणी करूनच त्यांना खेळण्याची परवानगी देण्यात येत आहे, तर सर्व संघांना सॅनिटायझरचा वापर करणेही अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती समालोचक तेजस धोबी यांनी दिली. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होत असल्यास जास्तीत जास्त प्रेक्षकांनी स्पर्धा ऑनलाइन पाहावी, असे आवाहनही आयोजकांकडून केले जात असल्याचेही तेजस यांनी सांगितले.

स्व. रतन बुवा पाटील चषक स्पर्धा रद्द

डोंबिवली ग्रामीणमध्ये दरवर्षी आयोजित केली जाणारी स्व. रतन बुवा पाटील चषक स्पर्धा ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ातील टेनिस क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये दरवर्षी लाखोंची बक्षिसे दिली जातात. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत ही स्पर्धा यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धामुळे स्थानिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते, तर या स्पर्धामुळे अनेकांचे अर्थार्जनही होत असते. यंदा करोनामुळे टेनिस क्रिकेट स्पर्धाचे आयोजन ४० टक्क्यांनी कमी झाले आहे, तर बक्षिसांची रक्कम तसेच खेळाडू आणि समालोचक यांच्या मानधनातही कपात झाली आहे.
– संदीप पाटील, अध्यक्ष, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन

हात आखडता

ग्रामीण भागातील राजकीय नेते मंडळींकडून या स्पर्धासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असतो. खेळांडूना लाखो रुपयांच्या बक्षिसांसह दुचाकी, मोबाइल, गाडय़ा अशा भेटवस्तूही दिल्या जातात. मात्र, यंदा प्रायोजकांनी हात आखडता घेतला आहे. एक लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे देणारे आयोजक यंदा ६० ते ७० हजारांची बक्षिसे देत आहेत, तर बक्षीस स्वरूपात मिळणाऱ्या दुचाकी, मोबाइल फोन या भेटवस्तू देण्याची संख्याही यंदा कमी झाल्याची माहिती पालघर जिल्ह्य़ातील टेनिस क्रिकेट खेळाडू शुभम घोष्टेकर याने दिली.