ठाणे जिल्ह्यात एकूण ६८७ रुग्ण; ठाणे शहरात सर्वाधिक रुग्णांची नोंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबईत २०, ठाणे, मीरा-भाइंदरमध्ये प्रत्येकी १७, कल्याण डोंबिवली १२, भिवंडी आणि अंबरनाथ शहरांत प्रत्येकी २ तर बदलापूर, ठाणे ग्रामीण परिसरात प्रत्येकी एक रुग्ण अढळला आहे. रविवार सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ६८७ पर्यंत पोहोचली आहे.

राज्यात करोनाविषाणूचा फैलाव झपाटय़ाने होत असून या संसर्गाचा फटका ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांनाही बसू लागला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी ही सर्व शहरे दाटीवाटीची असल्याने या शहरांमध्ये करोना संसर्ग पसरण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. हा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळून विविध उपाययोजना करत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या रविवार सायंकाळपर्यंत ६८७ वर जाऊन पोहोचली आहे. नवी मुंबई शहरात एकाच दिवसात २० नवे रुग्ण तर ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी १७ आणि कल्याण-डोंबिवलीत १२ नवे रुग्ण आढळून आले आहे. भिवंडी आणि अंबरनाथ शहरात प्रत्येकी २, तर बदलापूर आणि ठाणे ग्रामीण परिसरात प्रत्येकी १ रुग्ण अढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची संख्या ठाणे शहरात झाली आहे.

१३४ रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्यात रविवार सायंकाळर्प्यत १३४ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. रविवारी एकाच दिवसात ६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यापैकी ५ रुग्ण कल्याण-डोंबिवलीतील तर एक रुग्ण नवी मुंबईतील आहे. तर रविवारी जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.