ठाणे शहरात दाट वस्त्यांमध्ये मात्र परिस्थिती आटोक्यात; २० ते ४० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून साडेसातशेहून अधिक रुग्ण आढळून येत असून त्यात उच्चभ्रू वसाहती असलेल्या घोडबंदर भागातील दोनशे तर नौपाडा, वर्तकनगर आणि उथळसर या भागातील प्रत्येकी शंभर रुग्ण असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठी गृहसंकुले असलेल्या या सर्वच परिसरांची चिंता वाढली आहे. तर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांत ५० च्या आतच रुग्ण आढळून येत असून यामुळे शहरातील अन्य भागांच्या तुलनेत येथे करोना संसर्गाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. गेल्या २५ दिवसांत शहरात ७,७४२ रुग्ण आढळून आले असून त्यात २० ते ४० वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच २,९०६ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर, गेल्या दोन दिवसांपासून शहरात साडेसातशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरात १८ मार्चला ४२१ रुग्ण आढळले होते, तर २४ मार्चला शहरात ७९३ रुग्ण आढळून आले. गेल्यावर्षी शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांत करोनाचा शिरकाव झाला होता आणि त्यानंतर येथे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्या तुलनेत मोठी गृहसंकुले असलेल्या घोडबंदर, नौपाडा, वर्तकनगर आणि उथळसर या भागात रुग्णसंख्या काहीशी कमी होती. चार महिन्यांपूर्वी या सर्वच भागांत रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून त्यात घोडबंदर, नौपाडा, वर्तकनगर आणि उथळसर हे परिसर रुग्णवाढीत आघाडीवर आहेत. तर त्या तुलनेत वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. घोडबंदर भागात दोनशे तर वर्तकनगर, नौपाडा आणि उथळसर भागात प्रत्येकी शंभर रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे हे परिसर शहरातील करोनाचे केंद्र बनल्याचे चित्र आहे. मात्र या भागात करोना रुग्णसंख्येत नेमकी कशामुळे वाढ होत आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

वयोगटानुसार रुग्णसंख्या

वयोगट  महिला  पुरुष    एकूण

०-१९        २९४    ३८९    ६८३

२०-३९    ११८४   १७२२   २९०६

४०-५९    ११५२   १६१३   २७६५

६०-७९     ५६०    ६८७    १२४७

८०-९९       ६२     ७९     १४१

एकूण   ३२५२   ४४८९   ७७४२

 

करोना रुग्णसंख्या

७१,०१०    एकूण रुग्ण

६४,१३७    बरे झालेले रुग्ण

५४९९        उपचाराधीन रुग्ण

१३७४       आतापर्यंत मृत्यू