लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : वसई विरारमध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे करोनाचा प्रसार  रोखण्यासाठी पालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. त्यात मागील १५ दिवसांपूर्वी पालिकेने आठवडा बाजारांना रीतसर परवानगी दिली होती. ती परवानगी सध्या रद्द करत पुन्हा आठवडा बाजारावर बंदी आणली आहे. असे असतानाही शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरवले जात आहेत. यामुळे पुन्हा करोना प्रसाराची भीती वाढली आहे.

करोना काळात टाळेबंदीदरम्यान महापालिकेने आठवडा बाजारांवर बंदी घातली होती. पण करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारी महिन्यात पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी २५ आठवडे बाजारांना परवाने दिले होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसात शहरात पुन्हा करोना रुग्ण वाढत असल्याने पालिकेने ही परवानगी रद्द केली आहे.  यामुळे शहरात आठवडे बाजारांवर कारवाई केली जाईल असेसुद्धा पालिकेने सांगितले. तरीही शहरात अनेक ठिकाणी खुलेआम आठवडा बाजार भरविले जात आहेत. यामुळे पालिकेच्या नियमांची पायमल्ली होत आहे. या आठवडे बाजारात मोठय़ा प्रमाणात फेरीवाले आपली दुकाने मांडत असतात त्यात शेकडो नागरिक एका वेळी या बाजारात सामील होत असतात. वाढत्या गर्दीत शासनाच्या नियमांचे कोणतेही पालन होत नसल्याने करोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालिकेने करोना रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून आठवडा बाजारांची परवानगी नाकारली आहे, यामुळे जर कुठे असे बाजार भरविले जात असतील तर त्यांवर कारवाई केली जाईल.

-सुभाष जाधव, प्रभारी साहायक आयुक्त, प्रभाग सी