शहरात २८००हून अधिक सक्रिय रुग्ण, खासगी रुग्णालये मिळणे कठीण

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे करोना प्रसार थांबवण्याकरिता पालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाची दुसरी लाट आली असून करोना आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रविवारी समोर आलेल्या अहवालानुसार ३४० जणांना करोनाची बाधा झाली असून एकूण आकडा ३१ हजार ९९५ पोहोचला आहे. तर पाच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून एकूण मृत्यू संख्या ८३८ एवढी झाली आहे. त्यामुळे येत्या काळात करोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

रविवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यासह सामाजिक अंतर नियमांचे पालन आणि मास परिधान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याकरिता पथक तयार करण्यात आले आहे.

कारवाईकरिता पालिका आयुक्त रस्त्यावर

मीरा-भाईंदर शहरात करोना संसर्ग आटोक्यात आणण्याकरिता पालिका आयुक्त दिलीप दीले आणि पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे खुद्द पालिका आयुक्त कारवाईकरिता रस्त्यावर उतरले. या दरम्यान त्यांनी ६० जणांविरुद्ध कारवाई करून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पालिका जनसंपर्क विभागामार्फत देण्यात आली.