केवळ अडीच टक्के रुग्ण उपचाराधीन; ९५ टक्के बाधित उपचारांनंतर बरे

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शहरात केवळ २.६४ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.३८ टक्क्यांवर आले आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी २७२ दिवसांवरून आता २९७ दिवसांवर पोहोचला आहे. याशिवाय, मृत्युदरही २.३१ टक्क्यांवर आला आहे.

शहरात करोनाची परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी, दिवाळीनंतरच्या काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४८ हजार ९१८ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४६ हजार ४९४ (९५.०४ टक्के) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत १ हजार १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मृत्यूचे प्रमाण २.३२ टक्के होते. ते कमी होऊन आता २.३१ टक्क्यांवर आले आहे. शहरात करोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून गेल्या काही दिवसांपासून शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९५.०४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे शहरात सद्य:स्थितीत १ हजार २९३ रुग्ण आहेत. त्याचे प्रमाण २.६४ टक्के इतके आहे.

ठाणे शहरात दररोज सहा हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.७२ टक्के इतके होते; परंतु आता त्यातही घट झाली असून हे प्रमाण ८.३८ टक्क्यांवर आले आहे. रुग्णदुपटीचा कालावधी आठ दिवसांपूर्वी २७२ दिवसांचा होता, तो आता २९७ दिवसांवर गेला आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने हा कालावधी वाढला आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी आठवडय़ाचा रुग्णवाढीचा वेग ०.३० टक्के इतका होता. तो आता ०.२७ टक्क्यांपर्यंत आला आहे.