करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना अद्यापही काही ठिकाणी लोक रस्त्यांवर फिरत आदेशाचं उल्लंघन करताना दिसत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अशा लोकांना ताकीद दिली असून कोणीही जास्त शहाणपणा करु नका असं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी लोकांना घराबाहेर पडलात तर १४ दिवस जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली असल्याची ताकीद दिली आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनीधीदेखील आपापल्या मतदारसंघात लोकांची भेट घेत त्यांना घरीच थांबण्याचं आवाहन करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील कळवा-मुंब्रा येथील रहिवाशांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या अशी विनंती केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पोलिसांचा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. जितेंद्र आव्हाड यांनी स्पीकरच्या माध्यमातून जानकी नगरमधील लोकांशी संवाद साधला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
“जर आपण त्याच्यावरुन जाणार असाल तर तुम्हाला १४ दिवसांसाठी जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे. माझ्या बंधू, भगिनींनो मी तुमचा जितेंद्र आव्हाड बोलतोय….मी स्वत: तुम्हाला समजावण्यासाठी जानकी नगरमध्ये आलो आहे. याच्यापुढे जानकी नगर पूर्णपणे सील करण्यात येईल आणि एकाही माणसाला घराबाहेर पडायला देणार नाही. हे आम्ही आमच्या हौसेखातर बोलत नाही आहोत. तुमचा जीव वाचवण्यासाठी करत आहोत. जरी तुम्हला तुमचा जीव प्यारा नसेल तरी मला प्यारा आहे. मी कोणालाही जानकी नगरमधून घराबाहेर पडू देणार नाही. पोलिसांची पूर्ण ताकद जानकी नगरमध्ये लावण्यात येईल आणि तुम्हाला घऱात बंद करण्यात येईल. कोणीही जास्त शहाणपणा करु नका. आपल्या जीवाशी खेळू नका, घरात लहान मुलं, बायको, आई-वडील आहेत. संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर बाहेर या अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही. मी जितेंद्र आव्हाड बोलतोय हे लक्षात ठेवा आणि मी जे बोलतोय ते तुम्हाला पाळावंच लागेल, हे लक्षात ठेवा,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.