राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. हा पोलीस अधिकारी मुंब्रा येथे कार्यरत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासहित अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच पूर्वकाळजी म्हणून क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसंच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. यामुळे त्यांनाही होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे.

महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून बाधितांची संख्या १९८५ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून २१७ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.