वसई-विरार शहरातील सर्वाधिक ४५ टक्के रुग्ण नालासोपारा परिसरातील

वसई : वसई-विरार शहरातील रुग्णसंख्या साडेपाचशेपेक्षा अधिक झाली असून सर्वाधिक रुग्ण नालासोपारा परिसरातील आहे. नालासोपारा परिसरात २९०पेक्षा अधिक रुग्ण असून शहरातील इतर परिसराच्या तुलनेने नालासोपारा परिसर  अधिक धोकादायक ठरत आहे.

वसई-विरार शहरात पहिला रुग्ण १९ मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर आठवडय़ाला सरासरी पाच रुग्णांची वाढ होत होती. पाचव्या आठवडय़ापासून रुग्णांच्या वाढीने वेग पकडला. मागील दोन आठवडय़ांत तर शंभरी गाठली होती. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळू लागले ते नालासोपारा शहरात. रविवार २४ मेच्या आकडेवारीनुसार शहरात वसई ८२, विरारमध्ये १६६, नायगावमध्ये ९ रुग्ण आहेत. एकटय़ा नालासोपारा शहरात २३० रुग्ण होते. सोमवारी ६० रुग्णांची भर पडल्याने हा आकडा अधिक झाला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांची टक्केवारी काढली तर एकटय़ा नालासोपारा शहरात ४५ टक्के रुग्ण आहेत. म्हणजे शहरातील जवळपास निम्मे रुग्ण एकटय़ा नालासोपारा शहरातील आहेत.  शहरातील ११५ रुग्ण करोनामुक्त झाले असले तरी अद्यापही शहरातील शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. यामुळे वसई, नायगाव आणि विरारपेक्षा नालासोपारा शहर हे अधिक धोकादायक अवस्थेत आहेत.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार नालासोपारामधील बहुतेक करोनाबाधित मुंबईत कामाला जाणार आहेत. त्यामध्ये परिचारिका, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक, हॉटेलच कर्मचारी, प्रयोगशाळेतील मदतनीस, तंत्रज्ञ, औषधी विक्रीच्या दुकानात काम करणारे, वाहनचालक, विविध आस्थापनातील कामगार, भाजी विक्रेते यांचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून ते मुंबईत कामाला जात होते. नालासोपारा परिसरात दाटीवाटीच्या वस्त्या आहेत. त्यामुळे तिथे करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वाधिक मृत्यूही नालासोपाऱ्यात

नालासोपारा पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे करोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे. शहरात रविवार २४ मेपर्यंत एकूण २० मृत्यू झाले होते. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७ मृत्यू एकटय़ा नालासोपारा शहरात नोंदविण्यात आले आहेत.