ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात ४८६ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ८ हजार २६७ इतकी झाली आहे.

रविवारी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तीन शहरांत सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आले. तसेच दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यतील मृतांचा आकडा २५६ इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्य़ात रविवारी दिवसभरात ४८६ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामध्ये ठाणे शहरात १३१, नवी मुंबईत ९४, कल्याण-डोंबिवलीत ५४, भिवंडीत २८, अंबरनाथ ३५, उल्हासनगर २५, बदलापूर १२, मीरा-भाईंदर ८९ आणि ठाणे ग्रामीण मधील १८ रुग्णांचा समावेश आहे. रविवारी जिल्ह्य़ात १६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील ५, मीरा-भाईंदरमधील ५, नवी मुंबई शहरातील ३ तर कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर शहरांतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश  आहे.

वसई-विरार शहरात २२ रुग्ण

वसई : वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागात रविवारी एकूण २२ करोना रुग्ण आढळून आले. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ७५३ वर गेली आहे.रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १८ रुग्ण नालासोपारा शहरात, २ वसई पूर्व आणि १ रुग्ण विरार येथे आढळून आला आहे. नालासोपारामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी तीन रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

पनवेलमध्ये नवे ४० रुग्ण

पनवेल तालुक्यामध्ये रविवारी ४० नवे करोनाबाधित सापडले असून १९ जणांची प्रकृती बरी झाल्याने ते घरी परतले आहेत. अजूनही तालुक्यात २३१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात ६८९ जणांना करोनाची लागण झाली असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.