ठाण्यात करोनाने मृत्यू झालेल्या १६३ पैकी ११५ रुग्णांचे वयोमान ५० पेक्षा अधिक

किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत पाच हजार ३०३ करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यात २१ ते ५० वयोगटांतील रुग्णांची संख्या ३ हजार १६० असल्याचेही पुढे आले आहे, तर आतापर्यंत १६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक बळी ५०हून अधिक वय असणाऱ्यांचे आहे. ५०पेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जवळपास ७० टक्के आहे, तर उर्वरित ३० टक्के म्हणजेच ४८ रुग्ण ११ ते ५० वयोगटातील आहेत.

ठाणे शहरात आतापर्यंत ५ हजार ३०३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उर्वरित २ हजार ४८९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. शहरात ५१ ते ६० वयोगटांतील ९३६ रुग्ण आढळले असून त्यापैकी ४९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६०हून अधिक वयोगटांतील ७५९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांमध्ये या दोन्ही गटांतील रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ११५ आहे. उर्वरित ४८ रुग्ण ११ ते ५० वयोगटांतील असून त्यामध्ये ४१ ते ५० वयोगटांतील मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ३३ इतकी आहे.

५०हून अधिक वयोमान असणाऱ्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असे आजार बळावलेले असतात. तसेच त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.