News Flash

Coronavirus : ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा रुग्णवाढ

प्रशासनाची चिंता वाढली

प्रशासनाची चिंता वाढली

ठाणे : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्य़ातील अनेक भागांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र दिसू लागले होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुन्हा रुग्णवाढ होऊ लागल्याने प्रशासनापुढे चिंता वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत दररोज आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत सतत वाढ होत असून ठाणे शहरातील घोडबंदर, वर्तकनगर, नौपाडा, लोकमान्य-सावरकर, उथळसर आणि कळवा येथील रुग्णवाढ रोखण्याचे आव्हान महापालिकेस पेलावे लागणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ामध्ये आतापर्यंत १ लाख ३३ हजार ५६९ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख १४ हजार ८९६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर, ३ हजार ७२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जिल्ह्य़ात आठ दिवसांपूर्वी दररोज १२०० च्या आसपास रुग्ण आढळून येत होते. त्यामध्ये आता वाढ होऊन दररोज सरासरी १७८० इतके रुग्ण आढळून येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात सरासरी दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबर महिन्यात पहिल्याच दिवसापासून  हा आकडा ३०० ते ३५० पर्यंत पोहचला आहे. कल्याण-डोंबिवली शहरातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी दिवसाला ३०० ते ३५० रुग्ण आढळून येत होते. आता हा आकडा  ४५० हून अधिक आहे. त्याबरोबरच मीरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतही काही प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात रुग्णसंख्येत वाढ

ठाणे महापालिका क्षेत्रात ३१ ऑगस्टला १८८ रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये घोडबंदर म्हणजेच माजिवाडा-मानपाडा भागात २४, वर्तकनगर भागात ३१, लोकमान्य-सावरकरनगर परिसरात १२, नौपाडा-कोपरी भागात ५९, उथळसर भागात १६, वागळे इस्टेट परिसरात ३, कळवा परिसरात २९, मुंब्रा भागात ३, दिवा भागात ९ आणि पालिका हद्दीबाहेरील २ रुग्णांचा समावेश होता.  सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ६ सप्टेंबरला शहरात ३७४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात घोडबंदर भागात ९२, वर्तकनगर भागात ४५, लोकमान्य-सावरकरनगर परिसरात ३९, नौपाडा-कोपरी भागात ४१, उथळसर भागात ५३, वागळे इस्टेट परिसरात २७, कळवा परिसरात ४९, मुंब्रा भागात ११, दिवा भागात १७ आणि पालिका हद्दीबाहेरील ० रुग्णांचा समावेश आहे. यावरून  ठाणे परिसरात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

शहरनिहाय करोनाबाधित

शहरे                       आठवडाभरापूर्वी           आता

ठाणे                            १७४५                        २५८१

कल्याण-डोंबिवली      ३१३४                        ३८४८

नवी मुंबई                 ३४५३                          ३६४६

ठाणे ग्रामीण             १५२३                          १६८५

मीरा-भाईंदर            १४३३                          १७२९

उल्हासनगर             ४३३                             ४८३

बदलापूर                २९६                               ४०६

अंबरनाथ              ३१८                              ३१८

भिवंडी                 १२६                               १७३

ट्राळेबंदी शिथिल झाल्याने नागरिक मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ात दररोज आढळणाऱ्या करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यवर भर देणार आहे.

– डॉ. कैलास पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 1:22 am

Web Title: coronavirus outbreak in thane district again zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शीघ्र प्रतिजन चाचणीच्या रांगांमध्ये अंतरनियमांचा फज्जा
2 ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ
3 खड्डे आम्ही बुजवू.. आधी पैसे द्या!
Just Now!
X