मुंब्य्रात मात्र नागरिकांची गर्दी कायम; विनाकारण वाहने रस्त्यावर आणल्याने पोलिसांकडून कारवाईचा बडगा

ठाणे : करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेने कळवा, मुंब्रा आणि दिवा हे तिन्ही परिसर औषधालये वगळता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू केली. त्यास कळवा आणि दिवा परिसरात नागरिक आणि दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद दिला तर मुंब्य्रात मात्र नागरिकांची नेहमीप्रमाणेच गर्दी कायम असल्याचे चित्र होते. त्यामुळे येथील गर्दीला नियंत्रित करायचे कसे असा प्रश्न आता पालिकेकडे पुढे उभा राहिला असून मुंब्य्रात विनाकारण वाहने रस्त्यांवर आणल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत कारवाई करून ११० दुचाकी आणि ६७ रिक्षा इतकी वाहने जप्त केली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण आढळत असून या दोन्ही परिसरात संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. कळवा परिसरात आतापर्यंत दहा तर मुंब्य्रात दोन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीही किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत आहते. तसेच खरेदीच्या नावाखाली अनेकजण वाहने रस्त्यावर घेऊन फिरत आहे, हेच चित्र दिवा परिसरातही होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात खासगी वाहतूकीस पूर्णपणे बंदी घातली. त्यानंतरही या भागात नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिका, पोलीस आणि लोकप्रतिनिधी या सर्वानी हे तिन्ही परिसर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू केली. स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री परिसरांमध्ये जाऊन ध्वनिक्षेपकद्वारे नागरिकांना या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केले. सकाळपासूनच या तिन्ही भागांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कळवा परिसरात भाजीपाला, दुध तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होती तर काही ठिकाणी मात्र किराणा दुकाने सुरू होती. तसेच या भागातील रस्त्यावर नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत होते. मात्र, नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. दिवा परिसरातही टाळेबंदीला प्रतिसाद मिळाला. दिवा पश्चिम, स्थानक परिसर, साबे, सिद्धीविनायक गेट, मुंब्रादेवी कॅलनी, दातिवली येथील रस्ते ओस पडले होते. औषधालये वगळता भाजीपाला, दुध आणि किराणा दुकाने बंद होती. सकाळच्या वेळेत काही इमारतींच्या मागे छुप्या पद्धतीने भाजीपाला विक्री सुरू होती. मात्र, पोलिसांच्या पथक आल्यानंतर या विक्रेत्यांनी तेथून पळ काढला. या दोन्ही परिसरापेक्षा मुंब्य्रात मात्र काहीसे वेगळे चित्र होते. मुंब्य्रात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. मात्र, त्याचाही काहीच परिणाम झाला नसून मंगळवारी लागू केलेल्या टाळेबंदीनंतरही मुंब्य्रातील रस्त्यांवर नागरिकांची नेहमीप्रमाणेच गर्दी असल्याचे चित्र होते. या नागरिकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. पोलिसांनी अनेक वाहनांच्या चाकाची हवा काढली तर गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी ११० दुचाकी आणि ६७ रिक्षा इतकी वाहने जप्त केली.

वृंदावनमध्ये तपासणी सुरू

ठाण्यातील सर्वात मोठी वसाहत असलेल्या वृंदावन सोसायटीमध्ये एकाला करोनाची लागण झाल्याची बाब दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्यानंतर महापालिकेने त्या व्यक्तीला उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले तर त्याच्या कुटुंबीयांना दुसऱ्या रुग्णालयातील अलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवले आहे. तसेच हा व्यक्ती राहत असलेल्या इमारतीसह आजुबाजूच्या चार इमारती सील करण्यात आली असून तेथील नागरिकांना घरातच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या भागातील घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी सुरू केली असून त्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून येतात का, याची तपासणी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रुग्ण सापडलेले परिसर

कळव्यातील पारसिक, जानकीनगर, विटावा, सायबानगर या भागात तर, मुंब्य्रात अमृतनगर भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून या परिसरांवर महापालिका वैद्यकीय पथकाचे विशेष लक्ष असल्याचे चित्र आहे.

नौपाडय़ातील तो परिसर टाळेबंद

ठाणे येथील नौपाडा भागातील खासगी रुग्णालयातील एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने खासगी रुग्णालय सील केले आहे. या रुग्णालयाशेजारीच असलेल्या इमारतीत करोनाबाधित डॉक्टर राहत होता. त्यामुळे ही इमारतही सील करण्यात आली असून तेथील नागरिकांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.

प्रभाग समितीनिहाय करोनाबाधितांची संख्या

प्रभाग समिती               करोनाबाधित

माजीवडा-मानपाडा                      ४

वर्तकनगरनगर                            १

लोकमान्यनगर -सावरकरनगर     २

नौपाडा-कोपरी                               २

उथळसर                                         १

कळवा                                          १०

मुंब्रा                                             २

दिवा                                             ०

वागळे                                           ०

एकूण                                           २२