उपचारानंतर रोज ५० ते ६० किलो कचरा

वसई :  वसई-विरार शहरात करोना रुग्णांवरील उपचारानंतरचा ५० ते ६० किलो कचरा तयार होत आहे. याशिवाय नागरिकांनी वापरलेली तोंडाभोवतीची आवरणे (मास्क) थेट रस्त्याकडील कचऱ्यात फेकण्यात येत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागापुढे समस्या निर्माण झाली आहे.

वसई विरार शहरात सध्या करोनाचे २९ रुग्ण आहेत. शहरातील विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालिकेच्या अलगीकरण कक्षातही रुग्ण ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावरील उपचारानंतर तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याची सुविधा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याच्या निर्मुलनासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर राज्य मंडळाने तयार केलेल्या नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार या कचऱ्याची  विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. सध्या शहरात करोनावरील रुग्णांच्या उपचारानंतर दररोज ५० ते ६० किलो कचरा तयार होत आहे सर्व नागरिक मास्क वापरत आहेत. वापरलेले मास्क तसेच कचऱ्यात टाकण्यात येत आहेत. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यावर पालिकेने  शास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या विविध प्रभागात विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांचा कचरा स्वतंत्र उचलला जात आहे.

त्यासाठी काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये तो जमा केला जात आहे. यात हातमोजे, मास्क, उरलेले अन्न याशिवाय वापरण्यात आलेले इतर  साहित्य  पालिकेच्या आरोग्या विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केले जात आहे.

करोनाबाधितांवर उपाचारादरम्यान   वापरण्यात आलेला वैद्यकीय कचरा कचराभूमीवर नेऊन तात्काळ नष्ट केला जात असल्याची माहिती पालिकेचे प्रभारी स्वच्छता आयुक्त वसंत मुकणे यांनी दिली.

तसेच ज्या परिसरातून किंवा इमारती मधून करोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या इमारतींमधील सर्व जैववैद्य्कीय व इतर घनकचराही पालिकेच्या वतीने स्वतंत्ररित्या जमा करून विल्हेवाट लावली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘सोडियम हायड्रोक्लोराइड’चा वापर

पालिका क्षेत्रात जे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यावर पालिका भागातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशा रुग्णांचा कचरा जमा करण्याचे काम मेडिकल वेस्ट यांच्यामार्फत केले जात असून या रुग्णांच्या उपचारादरम्यान वापरण्यात येणारे विविध प्रकारचे साहित्य आहे ते ‘सोडियम हायड्रोक्लोराईड’ वापरून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावली जात आहे, असेही पालिकेने सांगितले.

 

कुठे,  किती रुग्ण?

वसई— १३

एव्हरशाईन ५, राजोडी ३, ओम नगर ३, साईनगर १, आनंदनगर १

विरार— ३

(गोकुळ टाऊनशीप १,

एमबीइस्टेट २)

नालासोपारा— १३

सेंट्रल पार्क १, आचोळे २,

विजय नगर ३,

नालसोपारा पुर्वे ४,

निळेगाव १, पेल्हार १,

हुनमान नगर १

२९ एकूण

०२ मृत

२७ उपचार सुरू