ठाणे जिल्ह्यत आतापर्यंत ५ हजार रुग्णांचा मृत्यू; दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत मात्र घट

ठाणे : जिल्ह्य़ात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत २ लाख ४७० नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ५ हजार ७० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. आता दररोज बाराशेच्या आसपास रुग्ण आढळून येत असून १५ दिवसांपूर्वी दररोज १७००हून अधिक रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्य़ाच्या दृष्टिकोनातून हे दिलासादायक चित्र आहे.

ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत २ लाख ४७० करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ८१ हजार ५२६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्य़ांच्या आसपास आहे, तर ६.९५ टक्के म्हणजेच १३ हजार ८७४ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत ५ हजार ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यूचा दर २.५३ टक्के आहे. जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येने आता दोन लाखांचा टप्पा पार केला असला तरी शहरात रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसांपूर्वी दररोज सतराशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता दररोज बाराशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ४७ हजार ८८८ करोनाबाधित कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यापाठोपाठ ठाणे शहरातील ४३ हजार ५७१ बाधित आहेत. तर, नवी मुंबई शहरातील ४२ हजार नागरिकांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला. जिल्ह्यातील २ लाख बाधितांपैकी १ लाख ३३ हजार ६७१ बाधित या तीन शहरांमधील आहेत. असे असले तरी या शहरांतील पालिका प्रशासनाने सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे तिथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण, बदलापूर, अंबरनाथ या भागांमध्येही करोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिह्यातील करोना संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे.