लोकसत्ता वार्ताहर

वसई : वसई-विरार शहरात पुन्हा एकदा करोना विषाणूने थैमान घातले आहे. याच पाश्र्वभूमीवर वसईत साजरा केले जाणाऱ्या यात्रा व उत्सव साजरे करण्यावर जिल्हा प्रशासन व पालिकेने र्निबध घातले आहेत.

वसईच्या भागात दरवर्षी विविध ठिकाणच्या भागात व गावोगावी ग्राम देव देवतांच्या यात्रा, उत्सव , उरूस, मिरवणुका असे उपक्रम राबविले जातात. यामध्ये मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी होत असतात. परंतु मागील फेब्रुवारी महिन्यांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.  शहरातील रुग्ण संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्येत ही भर पडली आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने पुन्हा कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वसई यात्रोत्सव, व इतर उत्सवासाठी मोठय़ा संख्येने नागरिकांची गर्दी होत असते. जर ही गर्दी झाली तर यामुळे सामाजिक अंतर , करोना नियमांचे उल्लंघन होऊन  पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ८ मार्चपासून यात्रा,  उत्सव भरविण्यास बंदी घालण्यात आली आहे.  पुढील आदेश होईपर्यंत ती कायम राहणार  आहे.

तुंगारेश्वर येथील महाशिवरात्री उत्सव रद्द

वसई पूर्वेतील तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या पुरातन महादेवाच्या मंदिरात दरवर्षी मोठय़ा उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा होत असतो. परंतु करोनाच्या पाश्र्वभूमीवर  कमीत कमी नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडाव्यात अशा सूचना वसईचे उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील तांगडे यांनी देवस्थान समितीला केल्या आहेत.