लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र होते. दररोज सहाशेपेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, बुधवारी ७९९ नवे करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे चित्र असून जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या २ लाख २५ हजार ५५२ वर पोहोचली आहे. तर, बुधवारी १५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ५ हजार ६३४ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यत नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून करोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला होता. जिल्ह्यतील करोनाचे केंद्र असलेल्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या तीन महापालिका क्षेत्रात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १५० पेक्षा कमी झाली होती. त्याचबरोबर मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीणमध्ये १०० पेक्षा कमी तर, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी महापालिका क्षेत्रांत दररोज ४० हून कमी रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे जिल्ह्यतील दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ६०० पेक्षाही कमी होती. मात्र, दिवाळीच्या काळात नागरिक मोठय़ा प्रमाणात बाहेर पडल्यामुळे करोनाच्या संसर्गात पुन्हा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन ते दिवसांपासून ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या तीन शहरांमध्ये १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर, बुधवारी जिल्ह्यत तब्बल ७९९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील २०४,  ठाणे शहरातील १९४, नवी मुंबईतील १८०, ठाणे ग्रामीणमधील ६७, मीरा-भाईंदरमधील ५१, बदलापूरमधील ४३, अंबरनाथमधील २३, उल्हासनगरमधील १९ आणि भिवंडीतील १३ रुग्णांचा समावेश आहे.