म्हाडाकडून उभारणी; आयुक्त, पालकमंत्री, गृहनिर्माणमंत्र्यांकडून पाहाणी

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शहरातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून एक हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच मुंब्रा येथील महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलातही म्हाडाच्या माध्यमातून एक हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारण्यात येणार आहे. करोनाबाधित रुग्णांना उपचार मिळावेत, या उद्देशातून ही रुग्णालये उभारण्यात येत आहेत.

ठाणे शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एक हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारण्यात येत आहे.

या रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. असे असले तरी भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुंब्रा येथील महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलात आणखी एक हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या जागेची जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी नुकतीच पाहाणी केली. या वेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजीत कुमार हे उपस्थित होते.

१०० खाटांचे आयसीयू युनिट

या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५०० खाटांची निर्मिती करण्यात येणार असून त्याचबरोबर १०० खाटांचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहे. मुंब्रा परिसरात निर्माण होणाऱ्या या रुग्णालयामुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे पालकमंत्री शिंदे सांगितले तर या रुग्णालयामुळे कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा परिसरातील करोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले.