लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यासाठी रुग्णवाहिकांची आठ ते दहा तास वाट पाहावी लागत असल्याची टीका महापालिका प्रशासनावर होत होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता ८१ रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आहेत. या सर्व रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यासाठी चोवीस तास स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना आता वेळेवर रुग्णवाहिका मिळतील, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रुग्णवाहिका भाडय़ाने घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने ८१ रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या ३ कार्डियाक, २ खासगी कार्डियाक रुग्णवाहिका आहेत.

तसेच १४ परिवहन बस रुग्णवाहिका, १५ खासगी शाळा बस रुग्णवाहिका, रुग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेली २० वाहने आणि ११ खासगी रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकांची पालकमंत्री शिंदे यांनी पाहणी करून ही संख्या १०० पर्यंत वाढविण्याच्या सूचना या वेळी केल्या.