आठवडा बाजार बंदचा आदिवासी बांधवांच्या हंगामी रोजगारावर परिणाम

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : दरवर्षी पावसाळा सुरू होताच विविध प्रकारच्या रानभाज्या या आठवडा बाजारात विक्रीसाठी येत असतात. परंतु यंदा करोनाच्या महामारीमुळे आठवडा बाजार बंद असल्याने रानातून आणलेल्या रानभाज्या विक्रीसाठी अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत. याआधी उन्हाळ्यात रानमेवा विक्रीचा हंगामही असाच निघून गेला होता.

वसईच्या ग्रामीण भागाला लागूनच डोंगर परिसर असल्याने या भागातील आजूबाजूला राहणारे नागरिक पावसाळ्यात रानात जाऊन विविध प्रकारच्या रानभाज्या गोळा करून आठवडा बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी जातात.

यामध्ये शेवळी, कोवाली, दिंडे, टाकळा, कोवळ्या बांबूची शिंद, खापरा व इतर प्रकारच्या रानभाज्या आहेत. या विक्रीतूनच दोन पैसे हाती पडतात. परंतु यंदा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील तीन महिन्यांपासून आठवडा बाजार बंद आहेत. त्यामुळे रानात जाऊन आणलेल्या भाज्यांची विक्री करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

दोन पैसे हाती येतील या आशेने रानात जाऊन रानभाज्या शोधून आणल्या जात आहेत. आठवडा बाजार नसल्याने आता भाज्यांची टोपली घेऊन रस्त्याच्या कडेला बसून विक्री करावी लागत आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात भाज्यांची विक्री करून परतीचा मार्ग धरावा लागतो. आठवडा बाजारात भाज्या घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असते. त्यामुळे भाज्यांना दरही चांगला मिळतो. रानभाज्या या हंगामी भाज्या असल्याने याची विविध ठिकाणच्या भागात मोठी मागणी असते त्यामुळे पावसाळ्याच्या अवघ्या काही दिवसांतच यातून साधारणपणे १५ ते २० हजार रुपयांची कमाई होते परंतु यंदाच्या वर्षी या होणाऱ्या कमाई वर पाणी सोडावे लागल्याचे या बांधवांनी सांगितले आहे.

करोना संकटाचा फटका

वसईच्या ग्रामीण भागात राहणारे बहुतांश आदिवासी बांधव हे विविध प्रकारच्या हंगामात तयार होणारी फळे, रानमेवा, फुले, रानभाज्या यातून हंगामी रोजगार मिळवत असतात. या वर्षी करोनाच्या संकटामुळे हंगामी रोजगारावर गदा आली आहे. रानमेव्याच्या विक्री काळातही रानमेवा मोठय़ा प्रमाणात विकला गेला नाही तर आता पावसाळ्यात तयार झालेल्या रानभाज्याचीही तीच अवस्था होत असल्याने हंगामी रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.

रस्त्याच्या कडेला बसून भाजी विक्री

करोनामुळे विविध ठिकाणच्या भागात करोनाचे रुग्ण भेटत असल्याने सर्वकाही बंद आहे. तर काही ठिकाणच्या गावात टाळेबंदीही लागू आहे त्यामुळे दारोदारी फिरून व बाजारात बसून रानभाज्यांची विक्री करता येत नाही यासाठी आता रस्त्याच्या कडेला बसून भाजी विक्री केली जात आहे. रस्ते जरी अंतर्गत असले तरी या मार्गावरून करोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची वर्दळ नेहमीपेक्षा कमी असल्याने या रस्त्यांवरून चालणाऱ्या वाहनांचा वेग कमालीचा वाढलेला आहे. अशा रस्त्यांवरून रानभाज्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अपघाताचा धोकाही निर्माण होऊ  शकतो. मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी विक्रेते धोका पत्करून रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.