नीलेश पानमंद/जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरहून अधिक करोनाबाधित रुग्ण वाढत असून यामुळे शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांमध्येही रुग्णांना ठेवण्यासाठी केवळ १२५ जागा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वच रुग्णालयांमध्ये केवळ २६ आयसीयू खाटा शिल्लक राहिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांना आयसीयू खाटांची गरज लागली तर तशी व्यवस्था उभी करण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे पुन्हा उभे राहिले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांपासून करोनाचा संसर्ग वाढला असून यामुळे करोनाबाधित रुग्णांना मुंबईला जावे लागू नये म्हणून राज्य शासनाने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. या ठिकाणी जिल्ह्य़ातील रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात येते. जिल्हा रुग्णालयात केवळ २७० खाटांची क्षमता असल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन कोविड रुग्णालये म्हणून जाहीर केली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला असून यामुळे करोनाबाधित रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे. त्यापैकी १६०० रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित १३४३ रुग्णे बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८९ रुग्ण आतापर्यंत मृत पावले आहेत. असे असले तरी शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत असून त्यापैकी अनेक रुग्णांना उपचारांसाठी आयसीयू खाटांची गरज असते. मात्र, शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये केवळ १२५ खाटा शिल्लक असून त्यात २६ आयसीयू खाटांचा समावेश आहे. शहरातील कोविड रुग्णालयांमधील खाटांची माहिती रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी महापालिकेने संकेतस्थळ निर्माण केले असून या संकेतस्थळाद्वारे शहरातील रुग्णालयात केवळ २६ आयसीयू खाटा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. तसेच काही करोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, अशा रुग्णांसाठी पालिकेने हॉटेल, शाळा आणि इमारतींमध्ये स्वतंत्रपणे १३६७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी ८९१ खाटा शिल्लक असल्याचेही समोर आले आहे.