लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्ह्यत करोना रुग्णांच्या उपचारासाठी आजच्या घडीला ३४ हजार ७ खाटा उपलब्ध असल्या तरी जिल्ह्य़ात केवळ सहा हजारांच्या आसपास रुग्ण आहेत. त्यापैकी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने २८ हजारांहून अधिक खाटा रिकाम्या असल्याचे चित्र आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये दिवाळीनंतर करोनाच्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून राज्यासह ठाणे जिल्ह्य़ात करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ठाणे जिल्ह्य़ात अशी लाट आली तर, रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मार्च महिन्याच्या अखेरीपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली. जिल्हा रुग्णालयाच्या मर्यादा लक्षात घेऊन सर्वच पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ती कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली. ही रुग्णालयेही अपुरी पडणार असल्याचे लक्षात येताच महापालिकांनी एमएमआरडीए, म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून शहरात तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्यास सुरुवात केली. यातून जिल्ह्यमध्ये गेल्या आठ महिन्यांत करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३४ हजार ७ खाटांची व्यवस्था उभारण्यात आली. यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि ठाणे ग्रामीण परिसराचा समावेश आहे. त्यात प्राणवायूचा पुरवठा असलेल्या ८ हजार ६८२ खाटा, अतिदक्षता विभागात २ हजार १५६ खाटा आणि ६९१ जीवरक्षक प्रणालीचा समावेश आहे. तर, जिल्ह्यत सध्या दररोज १० हजारांहून अधिक करोना चाचण्या होत आहेत. या सुविधांच्या उभारणीमुळे करोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळू लागले असून करोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यत आतापर्यंत २ लाख २४ हजार ७५३ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी ९४.५६ टक्के म्हणजेच २ लाख १२ हजार ५३४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यातील २.९४ टक्के म्हणजे ६ हजार ६०० रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नसल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. असे असले तरी शहरातील तात्पुरती कोविड रुग्णालये अद्याप बंद करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यत उपलब्ध असलेल्या ३४ हजार खाटांपैकी २८ हजारांहून अधिक खाटा सध्या रिकाम्या असल्याचे चित्र आहे. तर, जिल्ह्यतील ग्रामीण भागासह इतर महापालिका वाढीव आरोग्य सुविधा उभारण्यासाठी नियोजन करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यत करोनाची दुसरी लाट आली तर, रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

दररोज १० हजारांहून अधिक चाचण्या         

करोना रुग्णांवर त्यांच्या प्रकृती आणि लक्षणांनुसार उपचार केले जातात. यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि करोना रुग्णालय हे असे तीन प्रकार असतात. यापैकी रुग्णाला कोठे दाखल करायचे हा निर्णय डॉक्टर घेतात. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यत सध्या विविध ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये २१ हजार ७८२ खाटा, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ७ हजार ३१ आणि करोना रुग्णालयांमध्ये ५ हजार १९४ खाटा उपलब्ध आहेत. तर, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यतील चाचण्यांची संख्याही वाढली असून दररोज १० हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात धुणे, मुखपट्टीचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे या सर्व नियमांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यत करोनाची दुसरी लाट आली तर मागचे सर्व अनुभव पणाला लावून आम्ही जिल्ह्यत सज्जता ठेवली आहे.
– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे