कळवा, कोपरी-नौपाडा, वर्तकनगरमध्ये ३०च्या पुढे रुग्ण; दाटीवाटीच्या परिसरात मात्र करोना परिस्थिती आटोक्यात

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यातील दाट लोकवस्ती असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकरनगर, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये दररोज सरासरी १५ ते १७ तर, कळवा, कोपरी-नौपाडा, उथळसर, वर्तकनगरमध्ये ३० च्या पुढे करोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असतानाच उच्चभ्रू वस्ती असलेल्या घोडबंदर परिसरात मात्र रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून याठिकाणी दररोज सरासरी ५० ते ७० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे घोडबंदर परिसर करोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे तर शहरातील इतर परिसरात मात्र करोनाची परिस्थिती काहीशी आटोक्यात आल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे घोडबंदरची चिंता वाढण्याबरोबरच प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाला. यानंतर शहरात करोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला होता. त्यावेळेस शहरातील अतिशय दाटीवाटीचे परिसर असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकरनगर, कोपरी, उथळसर, कळवा आणि मुंब्रा या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. झोपडपट्टय़ा, चाळी आणि इमारती असलेल्या या परिसरात पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनानंतर येथील करोना संसर्ग काहीसा कमी झाला होता. गेल्या चार महिन्यांत शहरात करोना रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र होते. असे असले तरी त्यात शहरातील इतर भागांच्या तुलनेत घोडबंदर पट्टय़ात सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून येत होते. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शहरातील करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचे चित्र असतानाच गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी दररोज सरासरी ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते. परंतु आता दररोज सरासरी दोनशे ते तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण घोडबंदर भागातील आहेत. त्याखालोखाल कळवा, कोपरी-नौपाडा, उथळसर, वर्तकनगरमध्ये ३० च्या पुढे करोना रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये रुग्णाच्या संसर्गात आलेल्यांचे विलगीकरण, ताप तपासणी आणि करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर

एका इमारतीत पाचपेक्षा जास्त तसेच दोनशे मीटरच्या परिसरात १५ पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर ते परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन त्याआधारे प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या घोडबंदरमधील हिरानंदानी इस्टेटमधील कोपरी सोसायटी, कनोसा गार्डन, हिरानंदानी इस्टेट रोड, उज्ज्वल कन्स्ट्रक्शन, रुस्तमजी अथेना, अ‍ॅलेकझांड्रा इमारत, रुस्तमजी अ‍ॅस्ट्रिया, लोढा बुलेवार्ड, यशस्वीनगर म्हाडा कॉलनी, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु एक्स्पन्सीया, कल्पतरु इमेन्सा, कोलशेत रोड या भागांचा समावेश आहे.