News Flash

ठाण्यात लसीकरणासाठी आणखी दहा केंद्रे

शहरातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारपासून आणखी दहा नवीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.

गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; ज्येष्ठांना काहीसा दिलासा

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील १५ लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी येणाऱ्या ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांची गर्दी वाढली असून तिथे पिण्याचे पाणी आणि बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठांचे हाल होत आहे. याबाबत तक्रारी वाढू लागताच शहरातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारपासून आणखी दहा नवीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या आता २५ झाल्याने ज्येष्ठांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला १५ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येते. गेल्या तीन दिवसांपासून या सर्वच केंद्रांवर ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस आणि आरोग्यसेवक लस घेण्यासाठी एकाच वेळी येत होते. त्यामुळे या केंद्रांवर गर्दी वाढली होती. त्यातच तिथे खुर्चीची व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नव्हती. याबाबत महापालिकेकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने शहरात दहा केंद्रे वाढविले असून त्याचबरोबर सर्वच केंद्रांवर खुर्ची आणि पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

नवीन लसीकरण केंद्रे कुठे?

ठाणे शहरातील हाजुरी विलगीकरण कक्ष, सी. आर. वाडिया दवाखाना, ज्येष्ठ नागरिक सभागृह ढोकाळी नाका, बाळकुम पाडा क्रमांक १ मधील महापालिका शाळा क्रमांक ६०, ११२, ०४ ची इमारत, उथळसर आरोग्य केंद्र, आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्र, नौपाडा आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र, सावरकरनगर आरोग्य केंद्र

दिवस-रात्र केंद्रे सुरू ठेवण्याचे नियोजन

केंद्र शासनाने लसीकरण केंद्र २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले असून या पाश्र्वभूमीवर शहरातील लसीकरण केंद्रांवर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. या नियोजनानंतरच पालिका शहरातील लसीकरण केंद्र दिवस-रात्र सुरू ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:05 am

Web Title: coronavirus pandemic more ten corona vaccination centers in thane dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बेकायदा वसुलीसह वाहनतळही बंद
2 ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्याची दुरवस्था
3 ठाणे जिल्ह्याला उन्हाचे चटके
Just Now!
X