लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुस्लीम धर्मीयांच्या ‘शब ए मेराज’ आणि ‘शब ए बारात’ या सणांनिमित्ताने गर्दी होऊ नये म्हणून भिवंडी आणि मुंब्रा पोलिसांनी शहरात मशिदी आणि समाजमाध्यमांचा आधार घेत नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. मौलवींनाही त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप माध्यमांवर आणि मशीदीमधील अजानद्वारे आवाहन करण्यास पोलिसांनी सांगितले आहे. तसेच खबरदारी म्हणून दोन्ही शहरांत एकूण ९०० पोलिसांचा फौजफाटा या भागांत तैनात करण्यात येणार आहे. भिवंडी महापालिकेनेही नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

भिवंडी आणि मुंब्रा ही शहरे मुस्लीमबहुल भाग आहेत. भिवंडीत करोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी करोनाचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असते. मुस्लीम धर्मीयांच्या शब ए मेराज निमित्ताने नागरिक मशिदींमध्ये नमाज पठण करतात,  तर शब ए बारात निमित्ताने नागरिक कब्रस्थानमध्ये जाऊन मृत्यू झालेल्या नातेवाईकांच्या आठवणींना उजाळा देतात. यावर्षी शब ए मेराज गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे साजरी केली जाणार आहे, तर शब ए बारात २८ आणि २९ मार्चला साजरी करण्यात येणार आहे. या कालावधीत मशीदीमध्ये आणि कब्रस्थानमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे या सणांमुळे गर्दी होऊन करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

हे प्रकार टाळण्यासाठी भिवंडी आणि मुंब्रा पोलिसांकडून आता पावले उचलली जात आहे. भिवंडी येथे १७ कब्रस्थाने आहेत, तसेच ४० मशिदी आहेत. पोलिसांकडून या दोन्ही भागात एकूण ९०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यासोबतच शहरातील मौलाना तसेच मुस्लिम समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना समाजमाध्यामांवर शब ए मेराज आणि शब ए बारात निमित्ताने गर्दी टाळण्याचे आवाहन करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मशिदीच्या भोंग्याद्वारे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता कुटुंबीयांसोबत घरातच हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना पोलिसांद्वारे करण्यात येत आहे.

शब ए मेराज आणि शब ए बारात निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. त्यासोबतच पोलिसांचाही ठिकठिकाणी बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे.

– योगेश चव्हाण, उपायुक्त, भिवंडी परिमंडळ.