07 July 2020

News Flash

खासगी रुग्णालयांकडून लूट सुरूच, महापालिका प्रशासनाचे इशारे केवळ कागदावरच

पालिकेने दोन महिन्यांपासून उपचारासाठी शहरातील काही खासगी रुग्णालये आरक्षित केली आहेत. यापैकी बहुतांश रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट सुरू  असल्याच्या तक्रारी येत आहेत.

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे शहरात करोना रुग्णांच्या उपचारासाठी जादा बिलांची आकारणी करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनामार्फत सातत्याने देऊनही अनेक कोविड रुग्णालयांमधून रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. रुग्ण रुग्णालयात दाखल होताच ५० हजार रुपयांची अनामत रक्कम आकारणे, उपचारांच्या खर्चात वाढ होऊनही कुटुंबियांना अंधारात ठेवणे, रुग्णाला घरी सोडताना लाखो रुपयांची देयके आकारणे असे प्रकार सातत्याने पुढे येत असून महापालिका प्रशासन या आघाडीवर हतबल ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

पालिकेने दोन महिन्यांपासून उपचारासाठी शहरातील काही खासगी रुग्णालये आरक्षित केली आहेत. यापैकी बहुतांश रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट सुरू  असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी वाढू लागल्याने राज्य सरकारने मध्यस्थी केली होती.  तसेच पालिका प्रशासनानेही दर नियंत्रणासाठी उपायोयजना आखल्या होत्या. करोना उपचारासाठी आरक्षित रुग्णालयाच्या प्रवेशद्वारांवर दरपत्रकांचे फलकही लावण्यात आले होते. या सर्व उपाययोजनांनतरही शहरातील या रुग्णालयांकडून सामान्यांना अव्वाच्या सव्वा दर आकारणी सुरूच असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवडय़ात मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या एक पोलिस शिपायाच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मुंबईतील करोना रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने शुक्रवार, २२ मे रोजी रात्री दीड वाजता या शिपायाच्या ५२ वर्षीय पत्नीला ठाण्यातील एका नामांकित खासगी करोना रुग्णालयात दाखल करण्यास आणले होते. हवालदाराच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असतानाही रुग्णालय प्रशासनाने रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांकडून ५० हजारांच्या अनामत रकमेची मागणी केली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही या पोलिस शिपायाने पैशाची जुळवाजुळव करून पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तसेच गुरुवारी सायंकाळी या महिलेला घरी सोडताना उपाचारासाठी ८० हजार रुपये खर्च आला आहे. ३० हजाराच्या रकमेची ऐन वेळी मागणी केली. यावेळी पोलिस शिपायाने उसनवारी करून पत्नीचे रुग्णालयाचे देयक अदा केले. त्यांनी देयक वाढल्याचे कारण विचारले असता रुग्णालय प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.यासंबंधी ठाणे पालिकेतील आरोग्य विभागाचे समन्वयक विश्वनाथ केळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही.

योजनांची माहिती देण्यासही कुचराई

पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात करोनाचे उपचार घेतल्यास सूट मिळते. त्यासाठी एक अर्ज भरावा लागतो. मात्र, करोना रुग्णाच्या सोबत त्याच्या कुटुंबियांना थांबण्यास परवानगी नसल्याने पैशाची लूट करणारी खासगी रुग्णालये कुटुंबाला या योजनांची माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप घोडबंदर परिसरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लोकसत्ताशी बोलताना केला. यासंबंधी पालिका आयुक्त, आरोग्य विभागाकडे वारंवार संपर्क करुनही फारसा प्रतिसाद मिळत नाही असा अनुभव आहे, असेही डुंबरे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार आणि महापालिका म्हणदते त्या योजना अनेक लाभार्थी कुटुंबियांपर्यंत पोहोचत नसून त्यांना विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे, या पोलिस शिपायाच्या नातेवाईकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 8:35 am

Web Title: coronavirus pandemic private hospitals charging extra money dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 एसटी प्रशासन-कर्मचारी वाद टिपेला
2 उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू
3 करोनाचा कहर : वसाहतीतील अलगीकरण केंद्राला विरोध
Just Now!
X