प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : यावर्षी करोना महामारीने सर्वच सन उत्सवावर ग्रहण लावले आहे. त्यात उत्सवाच्या काळात हंगामी व्यवसाय करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीसारखा मोठा सन येऊन ठेपला आहे. पण करोनामुळे या सणाच्या काळात छोटेमोठे हंगामी व्यवसाय करणाऱ्या हजारो व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

दिवाळीच्या दिवसात अनेकजन केवळ छोटेमोठे हंगामी व्यवसाय करून आपला चांगला आर्थिक फायदा करून घेतात. यात प्रामुख्याने फराळ, फाटके, शोभेच्या वस्तू, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, आकाश कंदील, वेगवेगळ्या प्रकारच्या विजेची आकर्षक तोरणे, रांगोळी, पणत्या, सजावटीचे सामान, अशा व्यवसायत छोटीमोठी गुंतवणूक करून अनेक व्यवसाय केले जातात. पण यावर्षी मार्च महिन्यांपासूनच सुरू असलेल्या कोविड १९ या महामारीने सर्वाचे आर्थिक समीकरणे बदलून टाकली आहेत.

या महामारीमुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावल्याने उत्सवाची रंगत कमी झाली आहे. यामुळे एन सणासुदीच्या दिवसात बाजारपेठा थंडगार पडल्या आहेत.

तसेच दिवाळीच्या काळात फटाक्याचा व्यवसाय करणाऱ्या अमित जाधव यांनी सांगितले की, या वर्षी ऑर्डर्स आल्या नसल्याने त्यांनी मालच मागवला नाही. तर वेगवेगळ्या आकर्षक पणत्या आणि रांगोळी साहित्य व्यवसाय करणाऱ्या मानसी परब यांनीसुद्धा या वर्षी आपल्या व्यवसायाला पूर्ण विराम दिला आहे. अशाच प्रकारे वसई विरारमधील शकडो हंगामी व्यवसाय करणाऱ्या महिला तरुण-तरुणींना यावर्षी करोना महामारीमुळे  निराशा पत्करावी लागली आहे. दिवाळीच्या काळात हंगामी व्यवसाय करणाऱ्यांना पर्यायसुद्धा उपलब्ध नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात लोटली आहे.

फराळ व्यावसायिकही जेरीस

विरारमध्ये राहणाऱ्या शोभा पंतमिराशी या दिवाळीच्या दिवसात फराळाचा व्यवसाय करतात. दरवर्षी त्यांना महिनाभऱ्यापासून आगाऊ ऑर्डर असतात. पण यावर्षी हा व्यवसाय बंद केला आहे. केवळ काही मर्यादित ऑर्डर्स त्यांनी घेतल्या आहेत. मुळात तेल आणि इतर सामानांच्या किमती वाढल्याने फराळाचे भाव वाढले आहेत. तसेच आर्थिक परिस्थिती खालावल्याने ग्राहक मिळत नाहीत असे त्यांनी सांगितले.