लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मागील तीन आठवडय़ांपासून वसई-विरार शहरांतील करोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. मागील आठवडय़ात प्रथमच सर्वाधिक म्हणजे २६१ रुग्णांची नोंद झाली असून तब्बल ८ रुग्ण दगावले आहेत. करोनाच्या या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.

वसई-विरार शहरांत करोनाचे रुग्ण आढळून ११ आठवडे पूर्ण झाले आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीतील करोनाबाधितांची रुग्णसंख्या (३१ मेपर्यंत) ७५३ एवढी आहे. शहरात १९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. त्या आठवडय़ात अवघ्या एका रुग्णाची नोंद होती. त्यांतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात प्रत्येकी ५ रुग्ण होते. एप्रिल महिन्यातील चारही आठवडय़ांत रुग्णवाढीचा वेग दोन आकडय़ांवर मर्यादित होता. एप्रिल महिन्यातील आठवडय़ांमध्ये सरासरी ३० रुग्ण आढळत होते. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून शंभर रुग्ण आढळून आले. (११ मे ते १७ मे या आठवडाभरात ११७ रुग्ण आणि १८ मे ते २४ मे या आठवडय़ात १७३ रुग्ण आढळले होते, तर २५ मे ते ३१ मे या आठवडय़ात तब्बल २६१ रुग्ण आढळले आहेत. याच आठवडय़ात सर्वाधिक म्हणजे ८ मृत्यूची नोंद झाली आहे.

सर्वाधिक मृत्यू नालासोपाऱ्यात

वसई-विरारच्या शहरी भागांत करोनामुळे २७ जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील सर्वाधिक म्हणजे १४ मृत्यू नालासोपारा शहरातील आहेत. त्यातही १३ मृत्यू नालासोपारा पूर्वेचे आहेत. वसईत ५, विरारमध्ये ७ आणि नायगावमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

एका दिवसात २८ नवीन रुग्ण तर एकाचा मृत्यू

वसई विरार शहरात सोमवारी २८ नव्या रुग्णांची भर पडली आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर २६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरात २७ आणि ग्रामीण भागात १ रुग्ण आढळून आला. त्यात १ पोलीस, १ वाहनचालक, १ बस चालक, १ डॉक्टर तसेच २ परिचारिकांसह रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण २७ रुग्णांमध्ये नालासोपारामधील ११, विरारमधील १०, वसई आणि नायगाव मधील प्रत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे.  शहरी भागातील रुग्णसंख्या ७८० झाली तर ग्रामीण भागातील एकूण करोनाबाधीत ३७ एवढे झाले आहे.