27 May 2020

News Flash

CoronaVirus : वसई-विरारमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ

सध्या ६४४ जणांना अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

(प्रतीकात्मक छायाचित्र)

वसई : वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवार दुपापर्यंत एकूण २१ रुग्णांची नोंद झाली. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी रात्री विरारच्या एमबी इस्टेट येथे राहणाऱ्या एका इसमाला आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथे काही दिवसांपूर्वी एक करोनाचा रुग्ण आढळला होता. हा रुग्ण त्याच्या संपर्कात आल्याने त्याला आणि त्याच्या मुलाला लागण झाल्याचे पालिकेने सांगितले. त्याच्या पत्नीला अलगीकरणात ठेवण्यात आले असून पिता पुत्रावर उपचार सुरू आहेत.

सध्या ६४४ जणांना अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. २०३ जणांनी १४ दिवसांचा विलगीकरणाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. १२५ जण उपचार घेत असून १३४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आह. १०१ जणांना उपचारानंतर सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

२० नवीन व्हेंटिलेटर 

सध्या वसई विरार महापालिकेकडे एकूण २४ व्हेंटिलेटर आहेत त्यापैकी  बोळींज येथील कक्षात ४, कौलसिटी येथे १० आणि अग्रवाल येथे १० असे २४ वेन्टीलेटर आहेत.  आणखी २० वेन्टीलेटर मागविले असल्याची माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिली आहे.तसेच खाजगी रुग्णालयातही वेन्टीलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आणि नालासोपारा आमदार क्षितीज ठाकूर यांनी आपला आमदार निधी वेन्टीलेटरची खरेदी करण्यासाठी पालिकेला दिला आहे.

वसईतील करोनाबाधित क्षेत्र गुगल मॅपवर

वसई: आपल्या शहरात कुठे करोनाबाधित रुग्ण आहे, तो परिसर कुठे आहे याची माहिती आता घरबसल्या मोबाइलवर गुगल मॅपच्या साहाय्याने उपलब्ध झाली आहे. मुंबईतील तरुणांनी  करोना गुगल मॅप तयार केला आहे.

वसई-विरार शहरात मंगळवार दुपापर्यंत २१ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. वसई-विरार शहरातील वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळतात तो परिसर, ती इमारत पोलिसांकडून सील करण्यात येते. मात्र नागरिकांना त्यांची कुठलीच माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक अफवा पसरतात.

यासाठी करोनाबाधित रुग्ण असलेले क्षेत्र कोणते, करोनाचे हॉट स्पॉट कुठले याची माहिती आता गुगल मॅपवर मिळणार आहे. वसईच्या तरुणांनी मुंबईतील तज्ज्ञ डिझाइनरच्या मदतीने गुगल मॅपवर ही सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतील डिझाइनर अभिजीत एकबोटे यांनी मुंबई महापालिकेच्या मदतीसाठी गुगल मॅपमध्ये ही सोय उपलब्ध करून दिली होती. वसईचे पर्यावरण कार्यकर्ते सचिन मर्ती यांनी एकबोटे यांच्या मदतीने वसईतील करोनाचे हॉट स्पॉट असलेले क्षेत्र गुगल मॅपवर उपलब्ध करून दिले आहे. ज्या इमारतीत करोनाचा रुग्ण आढळला तो परिसर आणि त्याच्या आसपासच्या पाच ते सहा इमारती करोनाबाधित क्षेत्र म्हणून या गुगल मॅपवर टाकण्यात येतात. हा करोनाचा गुगल मॅप मोबाइलवरूनही पाहता येतो. त्यामुळे आपल्या शहरात कुठे करोनाचे रुग्ण आहेत, कुठला भाग करोना क्षेत्र म्हणून सील करण्यात आला आहे, त्याची माहिती नागरिकांना मिळते. त्या भागात जाऊ  नये हे नागरिकांना समजते. पालिका आणि पोलीस प्रशासनालादेखील या गुगल मॅपचा फायदा होऊन संबंधित ठिकाणी उपाययोजना करण्यास मदत मिळू शकेल, असे मर्ती यांनी सांगितले.

ख्रिस्तीधर्मीयांचा पवित्र आठवडाघरातच

ईस्टर संडेपर्यंतच्या सर्व प्रार्थनाविधींचे काही चर्चमधून थेट प्रक्षेपण

वसई : ख्रिस्तीधर्मीयांच्या ४० दिवसांच्या उपवासकाळातील सर्वोच्च उपासनाविधीला रविवारपासून सुरुवात झाली आहे. ‘पवित्र आठवडा’ असे ख्रिस्ती उपासना वर्षांत स्थान असलेल्या ‘ईस्टर संडे’पर्यंतच्या या आठवडय़ातील सर्व प्रार्थनाविधींचे काही चर्चमधून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या विधीमध्ये घरातूनच सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी केले आहे.

ख्रिस्तीधर्मीयांचा उपवासकाळ सुरू असून उपवासकाळातील शेवटच्या आठवडय़ाची सुरुवात रविवारपासून झाली आहे. रविवारच्या दिवशी ‘पाम संडे’ म्हणजे झावळ्यांचा रविवार साजरा झाला. येशूने जेरूसलेममध्ये प्रवेश केल्याच्या घटनेच्या स्मृती या विधीद्वारे जागविण्यात आल्या.    येत्या गुरुवारी ‘माँडी थस्डे’, शुक्रवारी ‘गुडफ्रायडे’ आणि रविवारी ‘ईस्टर संडे’ असे ख्रिस्ती श्रद्धेतील सर्वोच्च विधी या आठवडय़ात होणार आहेत.

ऐरवी या विधीना ख्रिस्तीधर्मीयांची चर्चमध्ये तुडुंब गर्दी होते. ‘गुडफ्रायडे’च्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या विधीसाठी दरवर्षी पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय चळवळीतील कार्यकर्तेही  विविध चर्चमध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित असतात. मात्र करोना विषाणूच्या भीतीमुळे यंदा चर्च बंद असल्यामुळे या सर्व प्रार्थनाविधीचे पापडी येथील ‘अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथ्रिडल’सह अनेक चर्चमधून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी २० मार्च रोजी मुख्य मिस्सा विधीसह सर्व प्रकारच्या प्रार्थना आणि चर्चसंलग्न संघटनांच्या सभा तथा विविध उपक्रम यांना ०४ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र सर्वत्र अनिश्चिततेचे सावट असल्यामुळे आता ४ एप्रिलनंतरही चर्चमधील सर्व विधी केवळ धर्मगुरूच पार पाडतील. त्यामध्ये भाविकांना सहभागी होता येणार नाही.

एकमेकांपासून वेगळे राहणे म्हणजेच एकमेकांची काळजी घेणे, हा विरोधाभास दिसतो. परंतु करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेकांपासून वेगळे राहणे अत्यंत जरुरीचे आहे.

डॉ. फेलिक्स मच्याडो, आर्चबिशप, वसई

संचारबंदी धुडकावून भाईंदरच्या चौपाटीवर गर्दी

भाईंदर : देशात करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. यात भाईंदरच्या खाडी चौपाटीच्या परिसरात अनेक नागरिक आपल्या लहान मुलांसह फेरफटका मारायला येत असल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णाची संख्या आता १७ वर पोहचली आहे. त्यामुळे मीरा रोड आणि भाईंदरमधील मेडतीयानगर, नारायणनगर, नयानगर, विनयनगर, एस.वी. रोड नित्यानंदनगर आणि आर. एन. ए. ब्रॉडवे परिसराला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीतदेखील अनेक नागरिक चौपाटी परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असल्याचे आढळून आले आहे. यात प्रामुख्याने अनेक नागरिक सकाळी व्यायाम करण्यास तसेच लहान मुलांना बागेत खेळण्यास घेऊन येत असल्याचे  दिसून आले आहे. त्यामुळे आता अशा नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पोलीस विभागाला दिले आहे. तसेच अत्यावश्यक गरज असल्यास घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका, असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उठाबश्या काढण्याची शिक्षा

मीरा रोड येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना नयानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास बर्वे यांनी भर चौकात उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली. तसेच यापुढे पुन्हा नागरिक रस्त्यावर आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:23 am

Web Title: coronavirus patients number increasing in vasai virar zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुलांच्या बांधकामांना करोनाची बाधा
2 “कोणीही जास्त शहाणपणा करु नका, आम्हाला हौस नाही”, बाहेर फिरणाऱ्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
3 दुर्दैवी: करोनाची लागण झालेल्या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
Just Now!
X