लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : करोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तविण्यात आल्यानंतरही अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरातील लग्नसोहळ्यांमध्ये गर्दी केली जात आहे. याशिवाय रात्री उशिरापर्यंत आतषबाजी केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

करोनाकाळात सण समारंभ आणि लग्नसोहळे साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावरील काही र्निबध अद्यापही हटविण्यात आलेले नाहीत. सुरक्षेचे नियम पाळून शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे असे सोहळे साजरे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्नासाठी ५० नातेवाईकांना सहभागी होण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येत आहे. मात्र, संख्येच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरी भागासह अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात लग्न सोहळे पार पडत आहेत. लहान- मोठे सभागृह, शेतघरे, खासगी बंगल्यांच्या ठिकाणी विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. यात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. सोहळ्यांसाठी सभागृहात २०० ते ३०० वऱ्हाडींची गर्दी उसळत आहे. त्यातही हळदीच्या सोहळ्यासाठी दीडशे ते दोनशे नातेवाईक जमत आहेत. या प्रवासात आणि लग्नमंडपात वऱ्हाडी मुखपट्टीचा वापरही करीत नाहीत. याशिवाय सायंकाळी पार पडलेल्या लग्नांत वेळेचे बंधन पाळले जात नाही.रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजीही केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष

टाळेबंदीची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून लग्न सोहळ्यांकडे मात्र काणाडोळा केला जात असल्याचे दिसून आले आहे. क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवून केली जाणारी वाहतूक, मुखपट्टीविना फिरणारे वऱ्हाडी सर्वत्र दिसत आहेत.