लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : दिवाळीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असतानाही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये अजूनही चाचण्यांना सुरुवात होऊ  शकलेली नाही. बदलापुरातील प्रयोगशाळा तीन महिन्यांपूर्वी उभी राहिली तर उल्हासनगरची प्रयोगशाळाही गेल्या महिन्यात पूर्ण झाली आहे. मात्र परवानग्यांसाठी काम थांबले होते असे कारण आता दोन्ही पालिकांकडून देण्यात येत आहे.

करोनाचा उद्रेक झाल्यापासून आजपर्यंत अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रुग्णसंख्या १५ हजारांच्या पार गेली आहे. अंबरनाथ शहरात ७ हजार ७३१ रुग्ण आढळले असून बदलापुरातील रुग्णसंख्या ७ हजार ८१८ वर गेली आहे. तर, उल्हासनगर शहरातील रुग्णसंख्या १० हजार ६२९ वर पोहोचली आहे. या तीनही शहरांमधील रुग्णांच्या चाचण्या शहरातच व्हाव्यात यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री यांनी २ जुलै रोजी आपल्या बदलापूर दौऱ्यात दोन प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला तशा सूचनाही केल्या होत्या. अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांसाठी बदलापुरात तर उल्हासनगरात एक अशा दोन प्रयोगशाळांच्या उभारणीच्या कामाला जुलै महिन्यात सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात बदलापुरातील प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले होते. तर, सप्टेंबर महिन्यात उल्हासनगरच्या प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात होते. मात्र, त्यानंतर आजतागायत या प्रयोगशाळा सुरू होऊ  शकलेल्या नाही.

या दोन्ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या परवानग्या मिळवण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात प्रस्ताव देण्यात आला होता. नुकत्याच या दोन्ही प्रयोगशाळांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाल्याची माहिती पालिका प्रशासनांनी दिली आहे. बदलापूरच्या प्रयोगशाळेत सुरुवातीला दररोज ३०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. तर उल्हासनगर शहरातल्या प्रयोगशाळेत दररोज ५०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. सध्याच्या घडीला अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सरासरी दीडशे चाचण्या केल्या जातात. तर, उल्हासनगर शहराचा आकडाही दीडशेच्या आसपास आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा नेमका अंदाज आजही बांधता येत नाही. त्यात दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर झालेला नागरिकांचा प्रवास करोनासाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी चाचण्या वाढवण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतरही प्रयोगशाळांच्या सुरू होण्याचा मुहूर्त ठरत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बदलापुरातील प्रयोगशाळेबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नोडल अधिकारी डॉ. हरिष पाटोळे यांना विचारले असता, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी नुकतीच मिळाली असून येत्या आठवडाभरात प्रयोगशाळा सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर, उल्हासनगर शहरातील प्रयोगशाळेबाबत महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना संपर्क केला असता तो होऊ  शकला नाही. तर आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनीही प्रतिसाद दिला नाही.