नौपाडा, घोडबंदरमधील गृहसंकुलांत वेगाने संसर्ग; दररोज ७०-७५ रुग्णांची नोंद

ठाणे : ठाण्यातील दाट लोकवस्ती असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकरनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमधील झोपडपट्टय़ा तसेच चाळींमधील करोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झाला आहे. मात्र, शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या नौपाडा-कोपरी आणि घोडबंदर भागातील इमारतींमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागला असून या दोन्ही भागांत दररोज प्रत्येकी ७० ते ७५ रुग्ण गेल्या काही दिवसांपासून आढळून येत आहेत. यामुळे शहरातील झोपडपट्टय़ा, चाळींऐवजी आता गृहसंकुलांमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र असून यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकरनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात चाळी आणि झोपडपट्टय़ा आहेत. या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागांवर लक्ष केंद्रित करून तेथे घरोघरी ताप तपासणी, रुग्णसंपर्क मोहीम, रुग्णांचे तातडीने विलगीकरण अशा उपाययोजना राबवल्या. त्यामुळे या दाट वस्त्यांमधील रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. असे असताना नौपाडा, कोपरी, घोडबंदर या भागांतील मोठय़ा गृहसंकुलांमध्ये रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.

टाळेबंदीच्या काळात गृहसंकुलांतील रहिवाशांनी स्वत: घरामध्ये कोंडून घेतले होते. मात्र, टाळेबंदी शिथिलीकरणानंतर हे नागरिक कामानिमित्त आता घराबाहेर पडू लागले असून यामुळे गृहसंकुलांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर नौपाडा-कोपरी हे रेल्वे स्थानकालगतचे परिसर असून या ठिकाणी मोठय़ा आस्थापनांसह भाजी मंडई आहेत. टाळेबंदीनंतर या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होती. यातूनच या भागांमध्ये संसर्ग वाढल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

चाचण्यांअभावी मुंब्य्रावर ‘नियंत्रण’?

काही महिन्यांपूर्वी रुग्ण संख्येत मुंब्रा आघाडीवर होता. नागरिक नियम पाळत नसल्यामुळे या ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या फारच कमी झाल्याचे चित्र असून रविवारी केवळ दोनच रुग्ण या ठिकाणी आढळून आले आहेत. असे असले तरी या ठिकाणी पुरेशा चाचण्या केल्या जात नसल्यामुळे रुग्णांची संख्या कमी असल्याच्या चर्चाही सुरू आहे.