१४ दिवसांची टाळेबंदी; शहरी भागात १३८, तर ग्रामीणमध्ये २९ करोनाबाधित रुग्ण

वसई : नायगाव पूर्वेतील परिसरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ  लागली आहे. त्यामुळे पालिकेने हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून घोषित केला असून ४ जूनपासून या परिसरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत या परिसरात एकूण १३८ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

वसई-विरार शहरात करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने पसरू लागला आहे. असे असताना नायगाव पूर्वेतील भागातही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जूचंद्र गाव, स्टार सिटी, परेरा नगर, गणेशनगर, नक्षत्र रेसिडन्सी, प्यारेलाल चाळ, भामिनी संकुल आदी ठिकाणच्या भागांत करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र तरीसुद्धा काही नागरिक नियमांचे पालन न करता बिनधास्तपणे रस्त्यावर फिरतात, तर दुसरीकडे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक घराच्या बाहेर पडतात. बाजारातही सामाजिक अंतर न राखता गर्दी केली जात होती. त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम हा या भागावर झालेला दिसून येऊ  लागला आहे.

दिवसेंदिवस या भागांत वाढत जाणारी करोना रुग्णांच्या संख्येमुळे नायगाव पूर्व परिसर हा करोनाचे नवे केंद्र तयार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या प्रकाराला रोखण्यासाठी आता पालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र १७ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आल्याची माहिती प्रभाग समिती ‘जी’चे प्रभारी सहायक आयुक्त सुरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे, तर या काळात नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेकडून आरोग्य मोहिमेला वेग

नायगाव पूर्वेतील परिसरात वाढती रुग्णांची संख्या तसेच जूचंद्र गाव यासह आजूबाजूच्या भागांतही करोनाग्रस्त रुग्ण सापडू लागल्याने नागरिक भयभीत आहेत. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक कर्मचारी यांची १२ लोकांची टीम तयार करून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीदरम्यान ज्या नागरिकांमध्ये करोना संसर्गाची लक्षणे आढळून येतील त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातील, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा गोसावी यांनी सांगितले आहे.

ग्रामीणमध्येही करोनाचा कहर

नायगाव पूर्वेतील जूचंद्र गावाला लागूनच चंद्रपाडा – वाकीपाडा हा ग्रामीण परिसर आहे. या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. शहरी भागाप्रमाणेच या भागातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत चंद्रापाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण २९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही इतर १४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती कामण उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मालिनाथ मलगे यांनी दिली आहे.