बदलापूर : बदलापुरात करोनाचा एक संशयित आढळला आहे. करोनाची लक्षणे आढळू लागल्याने त्याने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कै. दुबे रुग्णालयात धाव घेतली.

या रुग्णाची तपासणी केली असता या रुग्णात दाट लक्षणे आढळून आली. त्यामुळे या रुग्णाला तातडीने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उपचारासाठी दाखल केल्यानंतर या व्यक्तीचे नमुने घेण्यात आले असून आज शुक्रवारी या रुग्णाला करोनाचा संसर्ग झाला की नाही हे समजणार आहे. हा रुग्ण काही दिवस विमानतळावर कार्यरत होता अशी माहिती समोर येत आहे. या व्यक्तीने करोनाचा फैलाव झालेल्या कोणत्या देशात प्रवास केला होता का, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

विषाणूबाधितांची खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था

मुंबई : करोनाबाधित रुग्णांना जसलोक आणि मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयात दाखल रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची इच्छा असल्यास त्यांना तेथे उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी पद्मजा गोमारे यांनी दिली.

आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईमधील खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी चाचपणी सुरू होती. जसलोक आणि फोर्टिस रुग्णालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणखी काही खासगी रुग्णालयांमध्ये लवकरच खाटा उपलब्ध केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

परदेशवारी केलेल्या चौघांना रेल्वेतून उतरवले

पालघर : थायलंडवरून परतलेल्या चौघांना कच्छ एक्स्प्रेसमधून आज संध्याकाळीच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकात करोना संशयित म्हणून उतरवण्यात आले. हे चारही प्रवासी वापी येथील आपल्या मूळ गावी जात होते. यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

या प्रवाशांपैकी एक नव विवाहित जोडपे असून चौघेही थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. १८ मार्च रोजी परतल्यानंतर त्यांनी ठाणे येथील आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्य केले. त्यानंतर गुरुवारी वांद्रे टर्मिनस येथून कच्छ एक्स्प्रेस पकडली. रेल्वेतील सहप्रवाशांच्या तक्रारीवरून रेल्वे अधिकाऱ्यांनी गाडी पालघर येथे थांबवून त्यांना उतरविण्यात आले.