20 January 2021

News Flash

गावे करोनामुक्तीच्या दिशेने

ठाणे जिल्ह्य़ातील ४३१ पैकी ३७६ ग्रामपंचायती करोनामुक्त; २८ दिवसांत एकही रुग्ण नसल्याची नोंद

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढलेला करोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागले असतानाच जिल्ह्य़ातील एकूण ४३१ पैकी ३७६ ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्याची बाब समोर आली आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढलेला करोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागले असतानाच जिल्ह्य़ातील एकूण ४३१ पैकी ३७६ ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या २८ दिवसांमध्ये या ग्रामपंचायत क्षेत्रात एकही नवा करोना रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्य़ाच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आल्याचे चित्र आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागातील सर्वच ग्रामपंचायती १०० टक्के करोनामुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे.

ठाणे जिल्ह्य़ाच्या भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांतील ग्रामीण भागांत काही महिन्यांपूर्वी करोनाचा संसर्ग वाढला होता. या भागात आतापर्यंत १८ हजार २५८ करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८९.८९ टक्के म्हणजेच १६ हजार ४१३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर केवळ ७.०१ टक्के म्हणजेच १ हजार २८० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये ग्रामीण भागात करोना संसर्गाचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस पावले उचलून विविध उपाययोजना करण्यावर भर दिला होता. रुग्ण आढळणारे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्या ठिकाणी १४ दिवस आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत होते. त्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शिक्षक यांची पथके तयार करण्यात आली होती.

आतापर्यंत ग्रामीण भागात २ हजार २०७ प्रतिबंधित क्षेत्रातील १ लाख ९२ हजार ५४६ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान करोनाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना उपचारासाठी करोना उपचार केंद्रात दाखल केले जात होते. या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला असून ग्रामीण भागांत करोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागांतील ३७६ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही नवा करोना रुग्ण आढलेला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींना करोनामुक्त ग्रामपंचायती म्हणून जिल्हा परिषदेतर्फे घोषित करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागातील उर्वरित ग्रामपंचायत क्षेत्रांतील १४७ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आरोग्य सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

येत्या काही दिवसांत ग्रामीण भागांतील सर्वच ग्रामपंचायती १०० टक्के करोनामुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:22 am

Web Title: coronavirus thane becoming corona free dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 घोडबंदरचे सेवारस्ते ६ महिन्यांत चकाचक
2 उल्हास, वालधुनीचे प्रदूषण रोखा!
3 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
Just Now!
X