लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : करोना टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या नाटय़निर्मात्यांना दिलासा देण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील दोन्ही नाटय़गृहांसाठी भाडय़ात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या नाटय़गृहांमधील चारशे रुपयांपर्यंत तिकीट दर असलेल्या प्रयोगांसाठी २५ टक्केच भाडे आकारणी करण्यात येणार आहे. टाळेबंदीमुळे नाटय़ व्यावसायिकांचे झालेले आर्थिक नुकसान आणि सध्या ५० टक्के प्रेक्षकसंख्येची परवानगी या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना टाळेबंदीच्या काळात राज्यातील सर्व नाटय़गृहे बंद होती. नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने नाटय़गृहांत प्रयोग करण्यास परवानगी दिली. मात्र, एकूण आसनक्षमतेच्या निम्म्या प्रेक्षकसंख्येलाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाटय़ निर्मात्यांसमोरील आर्थिक अडचणी कायम आहेत. या पाश्र्वभूमीवर नाटय़गृहांच्या भाडय़ात कपात करण्याची मागणी होत होती. मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करत प्रवासातील टोल आणि नाटय़गृहांच्या भाडय़ात सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. तर मराठी सिने आणि नाटय़ अभिनेते प्रशांत दामले यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन नाटय़गृहाचे भाडे कमी करण्याची मागणी केली होती. ही मागणी महापालिकेने मान्य करत भाडेकपातीसंबंधीचा आदेश काढला आहे. सद्य:स्थितीत राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाचे तिकिटांचे किमान दर ५० रुपये ते कमाल दर १५० रुपये इत्के आहेत. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता नाटय़ व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर संस्था, कामगार वर्गाचा व्यवसाय सुरू राहावा तसेच मराठी नाटय़संस्था कार्यरत व्हावी या उद्देशातून येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन्ही नाटय़गृहांसाठी नाटकांचे कमाल दर ४०० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यास आणि या तिकीट दरापर्यंत मूळ भाडे २५ टक्के इतके आकारण्यास तसेच ज्या वेळेस तिकीट दर ४०० रुपयांपेक्षा जास्त आकारण्यात येईल, त्या वेळेस नियमानुसार नियमित भाडे आकारले जाईल, असे प्रशासनाने आदेशात स्पष्ट केले आहे.

ठाणे पहिलीच महापालिका

नाटय़गृहामध्ये नाटय़प्रयोग सादर करताना शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन नाटय़निर्मात्यांना करावे लागणार आहे. तसेच ही सवलत सर्व भाषांतील नाटकांच्या निर्मात्यांसाठी लागू राहणार आहे. मात्र सामाजिक संस्था, कंपन्या, क्लब यांना ही सवलत लागू राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ठाण्यातील नाटय़गृहाच्या भाडय़ात सवलत देणारी ठाणे ही पहिली महापालिका असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला.

टोलमाफीची मागणी

सरकारने नाटकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असली तरी पुन्हा एकदा संपूर्ण डोलारा उभा करण्यासाठी निर्मात्यांना मोठा आर्थिक ताण सोसावा लागणार आहे. त्यामुळे नाटय़गृहांचे भाडे आणि प्रवासातील टोल यांत सवलत देऊन निर्मात्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाने राज्य सरकारकडे केली आहे. मुंबईबाहेर प्रयोग करताना हजारो रुपये केवळ प्रवासातील टोलवर खर्च होतात. सध्या ते भरणे आर्थिकदृष्टय़ा अडचणीचे होत असल्याने नाटकाच्या गाडय़ांना, मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंना राज्यभरात टोलमाफी मिळावी, अशी मागणी संघाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.