लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रात करोनाची परिस्थिती आटोक्यात असली तरी परदेशात तसेच दिल्लीत आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्र्वभुमीवर पालिकेने सर्व यंत्रणांना सतर्क केले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी सांगितले. तसेच केंद्र शासनाकडून करोना लस उपलब्ध झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आतापासूनच त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी ७० टक्के तयारी पुर्ण झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी नागरी संशोधन केंद्रात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सुचना यावेळी दिल्या. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन करोना दुसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या तयारीबाबत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपस्थित होते.

करोना लसीकरणासाठी केंद्र शासनाने काही सूचना दिल्या असून त्यासाठी महापालिकेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातील डॉक्टर, रुग्णालये, दवाखाने, रक्तपेढी अशी सर्वाची यादी तयार करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात लसीकरण करण्यासाठी संपूर्ण आरोग्य सेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्यात येत असून ही सर्व कामे ७० टक्के पूर्ण झाली आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. लसीकरणाबाबत पूर्वतयारी असेल तर ऐनवेळेस धावपळ होणार नाही, त्यामुळे ही पूर्वतयारी करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सद्यस्थितीत करोनाचा संसर्ग कमी असला तरी शहरातील कोवीड रुग्णालये बंद करण्यात आलेले नाहीत. ‘ठाणे शहरात आता रुग्ण संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसांत ती वाढू शकेल की नाही, याबाबत आता सांगता येणार नाही. परंतु परदेश आणि दिल्लीसारखी रुग्ण संख्या वाढली तर त्याचा सामना करता यावा यासाठी खबरदारी घेण्याचे नियोजन आतापासूनच केले जात आहे,’ असे शर्मा यांनी सांगितले. करोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ  नये तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ  नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच रुग्णवाहिका, ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, ऑक्सिजन बेड, शीघ्र प्रतिजन आणि आरटी-पीसीआर चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचनाही आरोग्य विभागास दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुखपट्टीसाठी विशेष मोहीम

ठाणे शहरात मुखपट्टी वापरत नसलेल्या तसेच अंतर सोवळ्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी येत्या १० दिवसात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील साफसफाई कामाकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रभाग समितीनिहाय दररोज परिसर साफसफाई, रस्ते, सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याच्या सूचना आयुक्त शर्मा यांनी सहाय्यक आयुक्तांना बैठकीत दिल्या आहेत.

‘सध्या परिस्थिती नियंत्रणात’

दिवाळीच्या कालावधीत चाचण्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली होती. आता दिवाळीनंतर पुन्हा चाचण्यांची संख्या वाढवून ती सहा हजारांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण दोनशेच्या आत आहे. तसेच करोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८ टक्कय़ांवर असून येत्या काही दिवसात ते ७.३० टक्क्य़ांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मृत्यूदर हा २.३१ टक्कय़ांवर आला आहे. यापुर्वी तो ५ टक्के इतका होता. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. जर असाच कल राहिला आणि नागरिकांनी जर नियमांचे पालन केले तर ठाण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता कमी राहील, असे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.