राज्यात करोनाचा उद्रेक होत असताना लसीसोबतच आता रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही या इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याचं समोर येतंय. करोनाची लागण झालेल्यांना उपचारासाठी या इंजेक्शनची आवश्यकता असूनही इंजेक्शन मिळत नाहीये. कल्याण-शिळ रोडवर असलेल्या निऑन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेला उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असतानाही हे इंजेक्शन उपलब्ध होत नव्हतं. अखेर महिलेच्या मुलीने ट्विटरद्वारे मदतीची मागणी केली, त्यानंतर अखेर कुठे इंजेक्शन उपलब्ध झालं.

४८ वर्षीय अनिता कदम यांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कल्याण-शिळ रस्त्यावरील निऑन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती काल रात्री त्यांच्या मुलीने ट्विटरद्वारे दिली. माझ्या आईला उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, कृपया मदत करा अशी विनंती करताना त्यांच्या मुलीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना तिने टॅग केलं होतं. त्यानंतर लगेच ट्विटरवर मदतीचा ओघ सुरू झाला आणि काही इंजेक्शन उपलब्ध झाल्याची माहिती त्यांच्या मुलीने तासाभरात स्वतः दिली, सोबत मदत करणाऱ्यांचे आभारही मानले.

आणखी वाचा- मुंबईत ‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार, मेडिकलमधून पोलिसांनी जप्त केले २५० पेक्षा जास्त इंजेक्शन


दरम्यान, राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करावे तसेच काळा बाजार होऊ नये म्हणून अधिकतम किरकोळ किंमत (एमआरपी) कमी करावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्पादकांना केली. राजेश टोपे यांनी यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असं आवाहन खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये अशी विनंती केली. तसंच त्याची साठेबाजी करु नका असंही म्हणाले. रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक तैनात करावीत. उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा, असेही त्यांनी सूचविले.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्याला सध्या दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे. कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरुवात केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नविन उत्पादन यायला किमान २० दिवस लागतील. त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवड्याची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले आहे. मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. सध्याच्या तुटवड्याच्या काळात या प्रमुख उत्पादक कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा थेट शासकीय रुग्णालयांना करावा. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा पुरवठा केल्यास त्यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येईल, अशी यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होईल असे ते म्हणाले.