ठाणे महापालिकेचा अजब आदेश; वाहन नसलेल्यांचे काय, हा प्रश्न

ठाणे : करोना संशयित रुग्णाच्या घशातील द्रावाच्या चाचणीसाठी (स्वॅब) ठाणे महापालिका आणि इन्फेक्शन वैद्यकीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून ‘ड्राईव्ह थ्रू’ पद्धतीने कॅडबरी जंक्शन आणि कळवा नाका येथे तपासणी केंद्र सुरू केले आहे. मात्र, या केंद्रात चारचाकी घेऊन येणाऱ्यांचीच तपासणी करण्यात येणार आहे. दुचाकी किंवा चालत येणाऱ्यांसाठी या चाचणी केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेविषयी आश्चर्य निर्माण होत आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ठाणे महापालिका क्षेत्रातही सोमवापर्यंत ७६ रुग्णांची नोंद झालेली आहे. करोना संशयितांची तपासणी करण्यासाठी ठाणे महापालिका आणि इन्फेक्शन वैद्यकीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून कॅडबरी जंक्शन आणि कळवा नाका येथे ‘ड्राईव्ह थ्रू’ पद्धतीने स्वॅब चाचणी करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणत्याही प्रयोगशाळेत जावे लागू नये म्हणून ही ‘ड्राईव्ह थ्रू’ पद्धतीने चाचणी सुरू करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या तपासणी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले असून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही चाचणी करता येणार आहे. तपासणीसाठी येण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर रुग्णांना वेळ दिली जाते. त्यानंतर याठिकाणी संबंधित रुग्णाला तपासणीसाठी जावे लागणार आहे. तसेच येण्यापूर्वी पैसे भरल्याची पावती आणि महापालिकेच्या ताप बाह्य़रुग्ण तपासणी केंद्र किंवा खासगी ताप बाह्य़रुग्ण तपासणी केंद्रांकडून रुग्णाची करोना चाचणी आवश्यक असल्याबाबतचे शिफारस पत्र केंद्रांवर दाखविल्यानंतर रुग्णाचे ‘स्वॅब’ नमुने घेतले जाणार आहेत. मात्र, या तपासणीसाठी महापालिकेने चारचाकी हवी असल्याची अट घातली आहे. तर, ज्यांच्याकडे चारचाकी नाही त्यांना महापालिकेच्या ‘फिव्हर ओपीडी’मधून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याशी समन्वय साधून करोनाच्या रुग्णांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतून चाचणीसाठी जावे लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने सर्वसामान्य संशयित रुग्णांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

‘एखाद्या रुग्णाला करोनाची लागण झालेली असू शकते. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्यांना चारचाकीतून येण्याची अट घातली आहे. ज्यांच्याकडे चारचाकी उपलब्ध नाही. त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रुग्णवाहिकेतून येता येऊ शकते,’ असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.